तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या अधिपत्याखाली असलेली मंदिरे, वाहनतळासह इतर ठिकाणांच्या लिलावाची प्रक्रिया सोमवारी आयोजित करण्यात आली होती़ मात्र, लिलावास उपस्थित ठेकेदारांनी यावेळी बोलीच न लावल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, दुष्काळी पार्श्वभूमीवर अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याच्या भितीने अनेक व्यापाऱ्यांनी बोली लावली नसल्याची चर्चा आहे़शारदीय नवरात्रोत्सवात नारळ- खजूर, मंदीर दुकाने, वाहनतळ, पापनाश तीर्थ आदी ठिकाणांचा लिलाव करण्यासाठी सोमवारी जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता़ तसेच मंदिरातील चिंतामणीची मुदतही ३१ डिसेंबर रोजी संपत आहे़ त्या अनुषंगानेही प्रक्रिया होणार होती़ यावेळी संस्थानचे विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांची उपस्थिती होती़ यावेळी सरकारी बोली लावून लिलावास प्रारंभ करण्यात आला़ मात्र, उपस्थित ठेकेदारांपैकी एकाही ठेकेदाराने बोली लावली नाही़ त्यामुळे एका तासाच्या आतच ही प्रक्रिया गुंडाळावी लागली़ यावेळी मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यासह कर्मचारी, पुजारी उपस्थित होते़ (वार्ताहर)
मंदिरातील लिलावास बोलीच नाही
By admin | Updated: December 28, 2015 23:23 IST