परभणी : मर्यादेपेक्षा जास्त विहिरींना मंजुरी दिल्याचा ठपका ठेवत जिंतूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी मधुकर कदम यांच्या निलंबनाचे आदेश जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे यांनी सोमवारी काढले आहेत.जिंतूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी मधुकर कदम यांच्याविषयी यापूर्वीही अनेक तक्रारी झाल्या होत्या. जिंतूर तालुक्यातील शेवडी, दाभा, मोहखेडा, डिग्रस, खोलगाडगा अशा विविध गावात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी पं.स.च्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत. कदम यांच्याविरुद्ध झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने जि.प.ने त्यांचा जिंतूर येथील पदभार काढून घेत त्यांची बदली कृषी अधिकारी म्हणून सोनपेठ येथे केली होती. दरम्यान, याच प्रकरणात चौकशीसाठी एक सदस्यीय समितीही नेमली होती. या समितीने काही दिवसांपूर्वीच आपला अहवाल दिला. या अहवालानुसार सीईओ डुंबरे यांनी कदम यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. यासंदर्भात जि.प.चे कृषीविकास अधिकारी कच्छवे यांनी आदेश निघाले असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तत्कालीन बीडीओ मधुकर कदम निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 00:57 IST