हणमंत गायकवाड , लातूरमहाराष्ट्र विनाअनुदानीत अध्यापक महाविद्यालय संस्थाचालक असोसिएशनमध्ये फूट पडली असून, स्थापनेपासून अध्यक्ष असलेल्या राजेंद्र ऐनापुरे आणि देवेंद्र जोशी यांच्यात दोन गट पडले आहेत़ दोन्ही गटांनी बी़एड़ असोसिएशन सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे़ ऐनापुरे यांच्या असोसिएशनची २२ आॅगस्टला तर देवेंद्र जोशी यांच्या असोसिएशनची २३ आॅगस्टला सीईटी परीक्षा होणार आहे़ यामुळे अध्यापक महाविद्यालयांचे प्राचार्य व बी़एड़ ला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत़ राज्यात ५५० ते ६०० अध्यापक महाविद्यालये आहेत़ त्यात १२ शासकीय महाविद्यालयाचा व ४७ अनुदानीत खाजगी महाविद्यालयांचा समावेश आहे़ ६०० महाविद्यालयांपैकी ३२० महाविद्यालयांत बी़एड़च्या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी शासकीय सीईटी परीक्षा घेतली जाते़ तर उर्वरित २८० महाविद्यालयांतला प्रवेश महाराष्ट्र विनाअनुदानीत अध्यापक महाविद्यालय संस्थाचालक असोसिएशनच्या सीईटी परीक्षेद्वारे होतो़ २००३ पासून ही पद्धत आहे़ असोसिएशनच्या स्थापनेपासून खाजगी अध्यापक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येते़ मात्र या असोसिएशनमध्ये फूट पडली आहे़ संस्थापक अध्यक्ष माजी आ़ राजेंद्र ऐनापुरे यांच्या अध्यक्षतेखाली एक असोसिएशन असून, त्याचे सचिव श्रीरामकृष्णपंत खरोसेकर आहेत़ तर देवेंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने महाराष्ट्र विनाअनुदानीत अध्यापक महाविद्यालय संस्थाचालक असोसिएशन स्थापन झाले आहे़ त्याचे सचिव माजी प्राचार्य रमजान शेख आहेत़ या दोन्ही असोसिएशनने सीईटी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे़ ऐनापुरे यांच्या असोसिएशनची सीईटी परीक्षा २२ आॅगस्टला असून, देवेंद्र जोशी यांच्या असोसिएशनची २३ आॅगस्टला आहे़ यामुळे खाजगी अध्यापक महाविद्यालयांच्या प्राचार्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे़ प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्या असोसिएशनची परीक्षा द्यायला सांगावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे़देवेंद्र जोशी व रमजान शेख यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या असोसिएशनने तसेच माजी आ़ राजेंद्र ऐनापुरे व श्रीरामकृष्णपंत खरोसेकर यांच्या असोसिएशनने धर्मादायकडे असोसिएशनमध्ये झालेल्या बदलाबाबत अहवाल दिल्याचे समजते़ राजेंद्र ऐनापुरे यांच्या असोसिएशनचे प्रवेश पुणे येथून तर देवेंद्र जोशी यांच्या असोसिएशनचा औरंगाबाद येथून प्रवेश होणार आहे़ या दोघांपैकी कोणती सीईटी अधिकृत असा प्रश्न संस्थाचालकांना तसेच प्राचार्य व विद्यार्थ्यांना पडला आहे़
‘अध्यापक’ असोसिएशनमध्ये फूट
By admin | Updated: August 20, 2015 00:47 IST