नांदेड : कासवाची तस्करी करताना रंगेहाथ पकडल्यानंतर आरोपींनी कारसह कासवाची बॅग जागेवरच सोडून पोबारा केला होता़ त्यानंतर पोलिसांनी केवळ नोंद घेवून कासव ठाण्यातील हौदात सोडले होते़ हे प्रकरण चिघळल्याने १४ सप्टेंबर रोजी वनविभागाच्या अधिकाऱ्याने ठाण्यात येवून कासव ताब्यात घेत या प्रकरणाची सर्व माहिती देण्याबाबतचे पत्र पोलिसांना दिले़ गस्तीदरम्यान पोलिसांनी वीस दिवसांपूर्वी एका कारची तपासणी केली होती़ एका बॅगमध्ये कासव ठेवल्याचे आढळून आले़ चौकशी केली असता कासवाची तस्करी होत असल्याची बाब समोर आली़ पोलिसांना पाहताच कारसह कासवाची बॅग सोडून आरोपींनी पळ काढला़ मात्र गाडीचा चालक मात्र पोलिसांच्या तावडीत सापडला़ त्याची चौकशी केली असता अन्य व्यक्तींचाही माग लागला़ मात्र केवळ चौकशी करुन सर्वांची मुक्तता करण्यात आली़ तसेच गुन्हा दाखल न करता केवळ नोंद घेण्यात आली़ सदरील प्रकरणाची चौकशी वरवर करण्यात येत असल्याची कुणकुण लागताच लोकमतने याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशीत केले़ पोलिस व वनविभाग या दोघांनी एकमेकांकडे हात दाखवून जबाबदारी झटकली़ मात्र हे प्रकरण चर्चेत आल्याने १४ सप्टेंबर रोजी तब्बल २० दिवसानंतर ठाण्यात संपर्क साधला़ ठाण्यातील हौदात ठेवलेले कासव ताब्यात घेवून या प्रकरणाची इत्यंभूत माहिती पुरवण्याबाबतचे पत्र पोलिसांना दिले़ आत्तापर्यंत केवळ कासव वनविभागाच्या हाती लागले असून या प्रकरणातील कार व आरोपी कुठे आहेत? याबाबत चर्चा होत आहे़ कासवतस्करी दाबण्यासाठी कोणाकडून प्रयत्न झाले हाही चर्चेचा विषय बनला आहे़ चौकशीअंती आणखी कोणाची नावे समोर येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल़ (वार्ताहर)
पोलिसांकडील कासव अखेर वनविभागाकडे
By admin | Updated: September 14, 2014 23:37 IST