महेश पाळणे , लातूरग्रामीण भागातील खेळाडूंना सरावासाठी उत्कृष्ट दर्जाचे मैदान मिळावे, अधिकाधिक ग्रामीण खेळाडूंना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी शासनाने तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला़ या अंतर्गत २०१४ चे लक्ष ठेऊन ही संकुले तयार करण्याचा शासनाचा निर्धार होता़ मात्र २०१५ उजडले तरी राज्यातील तालुका क्रीडा संकुलाचे ‘मिशन’ फेल ठरल्याचे चित्र दिसत आहे़ त्यात लातूर जिल्हाही अपवाद नाही़ जिल्ह्यातील अनेक तालुका क्रीडा संकुलाचे काम अद्यापही पूर्ण नसल्याने शासनाचे क्रीडा धोरण कागदावरुन मैदानावर कधी येईल, याची वाट खेळाडू पाहत आहेत़दहा तालुक्यांचा जिल्हा असणाऱ्या लातूरला दहा पैकी आठ तालुक्यांच्या क्रीडा संकुलासाठी संचलनालयाकडून अनुदान प्राप्त झाले आहे़ मात्र ‘नकटीच्या लग्नात सतराशे साठ विघ्न’ या म्हणीप्रमाणे, जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलाची अवस्था झाली आहे़ कुठे जागेचा प्रश्न, कुठे जागा निश्चितीवरुन वाद तर काही ठिकाणी चालू असलेल्या कामांची गती कासवापेक्षाही धिमी यामुळे तालुका क्रीडा संकुले अद्यापही अर्धवट अवस्थेतच आहेत़ लातूर तालुक्यात मंजूर झालेले मुरुडचे तालुका क्रीडा संकुलाला १ कोटी मंजूर झाले आहेत़ ५० टक्के काम पूर्ण झालेल्या या संकुलात विविध खेळाचे मैदाने, धावनपथ, संरक्षण भिंत व अंतर्गत रस्त्यांचे काम अजूनही पूर्ण नाही़ निलंगा संकुलाचीही तिच अवस्था़ औसा व जळकोटचा निधी निलंगा येथे वर्ग करुनही काही कामे अपूरे आहेत़ उदगीर तालुक्याचे काम समाधानकारक असले तरी येथे ४० टक्के कामे अजूनही बाकी आहेत़ ३५ लाख अनुदान प्राप्त रेणापूर संकुलाचे काम धिम्या गतीनेच आहे़ संरक्षण भिंतीसाठी २५ लाख सा.बां. विभागाकडे वर्ग केले असून बाकी कामाचा या ठिकाणी अद्यापही पत्ता नाही़ अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील जागेची मोजणी चालू असून या ठिकाणचा प्रस्ताव लवकरच आयुक्ताकडे जाणार आहे़ चाकूर येथेही जागा निश्चिती नाही़ हणमंतवाडी की, चाकूर येथील जिल्हा परिषदेचे मैदान या दोन जागेच्या प्रश्नातच येथील क्रीडा संकुल लटकलेले आहे़ जळकोट तालुक्याचीही तिच अवस्था, शासकीय जागा निश्चित झाल्याचे सांगत असले तरी अद्यापही काही कारवाई नाही़ क्रीडा अधिकारी मात्र कारवाई चालू असल्याचेच पाढे सांगतात़ मंगळवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत तालुका क्रीडा संकुलाची चर्चा झाली़ यात लवकरात लवकर राहिलेल्या तालुक्यातील जागा निश्चिती करुन कामे करुन घेण्याचे निर्देश दिले आहेत़ काही तालुका क्रीडा संकुलाचे प्रस्ताव जरी गेले असले तरी तालुक्याच्या ठिकाणी जागा निश्चिती करण्यात न आल्याने ओरड चालू आहे़ तालुका नजीक काही गावाची निवड यासाठी करण्यात आली आहे़ त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणीच ही संकुले व्हावी, अशी मागणी काही तालुक्यातून होत आहे़ जिल्ह्यातील देवणी वगळता इतर तालुक्यात काही ठिकाणी बांधकाम चालू आहेत़ तर काही ठिकाणी जागा निश्चितीची प्रक्रिया चालू आहे़ मात्र प्रशासनाला अद्यापही देवणी तालुक्यासाठी जागा मिळालेली नाही़ त्यामुळे हा तालुका जागेविना लटकलेला आहे़
तालुका क्रीडा संकुलाचे ‘मिशन’ फेल
By admin | Updated: January 30, 2015 00:50 IST