औरंगाबाद : माणसाकडे जगभरातील माहिती असते, ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो; पण जगात शाश्वत फक्त 'आत्मा’च आहे. त्यास जाणून घेण्याचा प्रयत्न कोणी करीत नाही. 'स्व'ला जाणून घेण्यासाठी वेळ काढा, असे आवाहन युवाचार्य महेंद्रऋषीजी म.सा. यांनी रविवारी केले.
वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने आयोजित तीनदिवसीय प्रवचनमालेचा रविवारी दुसरा दिवस होता. युवाचार्यजींचे विचार ऐकण्यासाठी आलेल्या भाविकांनी महावीर भवनचा हॉल भरून गेला होता. यावेळी धर्मपीठावर महासतीयाजी सुमनप्रभाजी म. सा., किरणसुधाजी म. सा. यांची उपस्थिती होती.
महेंद्रऋषीजी म. सा. यांनी सांगितले की, आज आचार्य भगवन्त आत्मारामजी म. सा. यांची जयंती आहे. आपल्या जीवनातही आत्माच शाश्वत आहे. बालपण, तारुण्य व वृद्धावस्था येतात. मात्र, आत्मा तोच राहतो. आत्मा जर शरीरातून निघून गेला तर काहीच राहत नाही, सर्वजण त्याच्यापासून दूर होतात. यामुळे स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःला ओळखा, असे महाराजांनी नमूद केले.
जीवन हे भोगण्यासाठी नव्हे तर त्याग करण्यासाठी आहे, असे सांगून अक्षयऋषीजी म. सा. यांनी सांगितले की, जोपर्यंत ढगात पाणी असते तेव्हा ते ढग काळे असतात, पाऊस पडतो, तेव्हा ढगातील पाणी निघून जाते व ढग पांढरे स्वच्छ होतात. तसेच त्यागाने जीवन आनंदी बनते. सुमनप्रभाजी म. सा यांनी सांगितले की, महापुरुषांचा सत्संग अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेत असतो. यासाठी साधुसंतांचे विचार ऐकून त्यांचा जीवनात अवलंब केला, तर जीवन सुखी, आनंदी होईल.
चौकट
छोटा पंढरपूर येथे दीक्षा दिवस
युवाचार्य महेंद्रऋषीजी म.सा. यांचा दीक्षा दिन सोहळा ३ फेब्रुवारी रोजी छोटा पंढरपूर, वाळूज येथे साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
कॅप्शन
युवाचार्य महेंद्रऋषीजी म.सा. यांचे प्रवचन ऐकण्यासाठी जमलेल्या श्रावक व श्रविकांनी महावीर भवन भरून गेले होते.