औसा : शासनाने येथे तहसील कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशा दोन वास्तु उभा केल्या असून गत महिन्यात या इमारतींचे लोकार्पणही झाले़ त्यामुळे तहसील कार्यालयाचे कामकाजही नवीन इमारतीमध्ये सुरु झाले़ परंतु, तहसील कार्यालयातून निघणारे प्रत्येक प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रांची फाईल ही सेतू- सुविधा केंद्रातूनच विविध विभागांकडे जाते़ त्यामुळे सेतू सुविधा केंद्रात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते़येथील तहसील कार्यालय एकीकडे आणि सेतू सुविधा केंद्र दुसरीकडे झाल्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची मात्र धावपळ होत आहे़ सर्वसामान्य नागरिकांना विविध गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ ही गैरसोय टाळण्यासाठी सेतू सुविधा केंद्र नवीन इमारतीत हलवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़ तहसील कार्यालयातून विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सेतू सुविधा केंद्रात प्रस्तावाद्वारे दाखल करावी लागतात़ या केंद्रात शपथपत्र तयार केल्यानंतर त्यावर अव्वल कारकुनची स्वाक्षरी घ्यावी लागते़ सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव केल्यानंतरच प्रस्ताव दाखल होतो़ सध्या मराठा व मुस्लिम यांना जातीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे़ या प्रमाणपत्रासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे़ यासाठी काही कागदपत्र कमी पडले अथवा एखादी त्रुटी निघाली की विद्यार्थी व त्याचे पालक किंवा अन्य नागरिकांना इकडून- तिकडे हेलपाटे मारावे लागत आहेत़ सेतू सुविधा केंद्र व तहसील कार्यालय हे अंतर जवळपास एक कि़मी़ आहे़ त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे़ तहसील कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या वास्तू होऊनही सेतू सुविधा केंद्र जुन्याच इमारतीत आहे़ त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे वेळ व पैैशाचा अपव्यय होत असल्याने नागरिकांत नाराजी आहे़ (वार्ताहर)
तहसील एकीकडे अन् सेतू दुसरीकडे
By admin | Updated: September 21, 2014 00:26 IST