पालम : तालुक्यात जुलै महिना संपत आला तरी पाऊस पडलेला नाही. श्ोतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे वाया गेले आहे. यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी माजी खा. सुरेश जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी व सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून कैफियत मांडली आहे. पालम तालुक्यात अजूनही चांगला पाऊस पडलेला नाही. अल्पश: पावसावर खरिपाची पेरणी उरकून घेतली आहे. पेरणीनंतर पाऊस उघडल्याने हजारो रुपये खर्चून पेरणी पूर्णत: वाया गेली आहे. उगवलेली कवळी रोपे पाण्याअभावी वाळून जात आहेत. कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतावरील शेतसारा माफ करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत करावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, भारनियमन बंद करावे, बँकांची व सावकाराची कर्ज वसुली थांबवावी, गारपीटग्रस्त वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून मजुरांचे स्थलांतर थांबवावे, पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा, दुबार पेरणीसाठी बियाणे व रासानिक खताचा पुरवठा करावा, बोगस बियाणांची विक्री थांबवावी यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. भगवान आगे यांना देण्यात आले आहेत. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी खा. सुरेश जाधव, प्रभाकरराव सिरस्कर, दत्तराव जवळेकर, अॅड. विजयकुमार शिंदे, अॅड. सुनील देशपांडे, पं.स. सदस्य नामदेव कदम, बंडू जाधव, किशोर कदम, सुभाष जाधव, भीमराव इतनर, माधव निळे, मन्मथ काळे, भारत इतनर, लिंबाजी पौळ आदींनी दिला आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांनी मांडले गाऱ्हाणेपालम तालुक्यात अजूनही पाऊस झालेला नाही. मध्यंतरी हलकासा पाऊस झाला होता. पाऊस पडेल या आश्ोने शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु दररोज आता आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणांवर केलेला खर्च बियाणे न उगविण्याची भिती यासह विविध समस्या तहसीलदारांसमोर मांडल्या आहेत. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी वाईट प्रसंग ओढवल्याची माहिती दिली.
दुष्काळाच्या मागणीसाठी गाठले तहसील कार्यालय
By admin | Updated: July 19, 2014 00:39 IST