लातूर : स्वाईन फ्लूचा एच१ एन१ व्हायरस जिल्ह्यात सक्रिय झाला आहे. आतापर्यंत सात जणांचा बळी गेला आहे. यातील चौघा जणांचा अहवाल स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आहे. तर अन्य एकाचा निगेटिव्ह अहवाल आला आहे. तर दोघांचा अन्य आजाराने मृत्यू झाल्याचे निदान झाले आहे. एकंदर, ४० ते ४५ रुग्णांनी स्वाईन फ्लू संशयित म्हणून उपचार घेतले आहे. असे असतानाही प्रशासन गाफिलच आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागात ताळमेळ नसल्याने स्वाईन फ्लूची भीती रुग्णांमध्ये निर्माण झाली आहे.लातूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालय वैद्यकीय शिक्षण खात्याकडे आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाकडे जिल्हा रुग्णालय नाही. त्यामुळे रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण खात्याच्या सर्वोपचार रुग्णालयाकडे आहे. जिल्ह्यात उदगीर, निलंगा येथे सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपजिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयात स्वाईन फ्लूसदृश आजारावर उपचाराची सुविधा आहे. निलंगा व मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात स्वाईन फ्लू उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु, जनजागरणाचा अभाव दिसत आहे. काय करावे, काय करू नये, या संदर्भात नागरिकांमध्ये प्रबोधन होण्याची गरज आहे. परंतु, रुग्णालय अधिकारी-कर्मचारी मर्यादितच बैठका घेतल्या जात आहेत. त्यापुढे या दोन्ही विभागाची मजल गेलेली नाही. त्यामुळे संशयित रुग्णांची संख्या वाढतच आहे. शाळा, महाविद्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी या रोगासंदर्भात समज-गैरसमज दूर करण्यासाठी कार्यशाळा घेण्याचे नियोजन आहे. परंतु, प्रशासनाकडून असल्या कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाची प्रत्येकी एक बैठक झाली. त्यानंतर बैठक नाही की, प्रबोधन नाही. मनपाची यंत्रणाही बेफिकीर आहे. त्यांचे सहा केंद्र नावालाच आहेत. त्यात ना रुग्ण ना कोणी तपासणीला जाते. सुविधा नसल्याने ही स्थिती आहे. (प्रतिनिधी)सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत ४५ संशयित रुग्णांवर उपचार करण्यात आले. यात चौघा जणांचा मृत्यू झाला. त्यांचा अहवालही पुण्याच्या प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह आला आहे. तर दोघा रुग्णांचा खाजगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला आहे. त्यांच्या अहवालाबाबत दोन्हीही विभाग अनभिज्ञ आहेत. अन्य एका रुग्णाचा संशयित स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इतके रुग्ण वाढत असताना सामान्य प्रशासन आणि आरोग्य प्रशासन गाफिल असल्याचेच दिसत आहे. आणखी किती रुग्णांचा बळी गेल्यानंतर यांना जाग येणार आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.सद्य:स्थितीत सर्वोपचार रुग्णालयात एकूण आठ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तिघे संशयित स्वाईन फ्लू आहेत. आठपैकी पाच रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. तरीही आरोग्य यंत्रणा जनजागृतीकडे दुर्लक्ष करीत आहे. शिवाय, आयसोलेटेड वॉर्डातही सुविधांचा अभाव आहे.स्वाईन फ्लू का होतो, त्याची कारणे काय आहेत, काय करायला हवे या संदर्भात होर्डिंग्ज, बॅनर्स, जनजागरण रॅली काढून जनजागृती करणे आवश्यक आहे. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्त्याखाली असलेला प्रशासन विभाग गाफिल आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. सातपैकी चौघांच्या मृत्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. अन्य तिघांच्या अहवालात वेगवेगळी मृत्यूची कारणे असली, तरी ते स्वाईन फ्लू संशयित म्हणूनच दाखल झालेले होते. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून जनजागृती करावी, अशी मागणीही काही संघटनांनी केली आहे.
‘स्वाईन फ्लू’चा उद्रेक; प्रशासन गाफील !
By admin | Updated: February 16, 2015 00:52 IST