जालना : परतूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी बुधवारी मुंबईतील गांधी भवन येथे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करताच, त्यांची उमेदवारीही प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केली. दीड वर्षापूर्वी जेथलियांनी दिलेला शब्द पाळला, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, महाराष्ट्राचे सहप्रभारी बालाराम बच्चन, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, पशुसंवर्धन मंत्री अब्दूल सत्तार, कामगार राज्यमंत्री राजेंद्र गावीत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री चव्हाण व प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी शाल, श्रीफळ देऊन पुष्पहाराने जेथलिया यांचे स्वागत केले. मे २०१३ मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यात शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत आ. जेथलिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर जेथलिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याबाबत ‘लोकमत’ शी बोलताना आ. जेथलिया म्हणाले की, मुख्यमंत्री चव्हाण यांनी परतूर येथे निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना व जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी ४५ कोटींचा निधी मंजूर केला होता. इतर विकास कामांसाठीही मदत केली. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासमक्ष आपण मुख्यमंत्र्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असा शब्द दिला होता, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
सुरेशकुमार जेथलियांच्या काँग्रेस प्रवेशासह उमेदवारीही जाहीर
By admin | Updated: September 11, 2014 00:37 IST