औरंगाबाद : नॅकचा ‘अ’ दर्जा मिळाल्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. विद्यापीठ हद्दीतील औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद हे दुष्काळी जिल्हे आहेत. या जिल्ह्यांतील शेतकरी व शेतमजुरांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून, औरंगाबादेत मुलांना शिक्षणासाठी पाठविण्याचा खर्च त्यांना परवडणारा नाही. दुसरीकडे खाजगी महाविद्यालयांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांची खिरापत वाटल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी जवळच्या महाविद्यालयातच प्रवेश घेण्यास पसंती दर्शवली आहे. या बाबींमुळे यंदा विद्यापीठातील ४० पैकी अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे विभाग ओस पडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे बोलले जाते. एकीकडे विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ दर्जा मिळाला आहे. त्यामुळे विद्यापीठाची शैक्षणिक प्रतिमा उंचावली असून, मागील वर्षापासून या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आकर्षित झाले आहेत; पण यंदा अनेक पदव्युत्तर विभागात प्रवेशाची मुदत संपुष्टात आली तरी एकही प्रवेश झालेला नाही. त्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र आणि शारीरिक शिक्षण या विभागांचा समावेश आहे. विद्यापीठात ४० पेक्षा अधिक पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जाणारे विभाग आहेत. या विभागात प्रत्येकी ७० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. असे असले तरी आतापर्यंत उर्दू विभागात ०३, पाली आणि बुद्धिझम विभागात ०६, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र १३ एवढ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत. आॅनलाईन प्रवेशाची उद्या अखेरची मुदत आहे, हे विशेष. काही विभागांना चांगला प्रतिसादविद्यापीठातील काही विभागांना मात्र, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसते. यातील अर्थशास्त्र विभागात १२५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केलेली आहे. इंग्रजी विभागात ९५, इतिहास विभागात ८२, राज्यशास्त्र विभागात ७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांना विद्यार्थी मिळेनात
By admin | Updated: July 8, 2014 01:05 IST