जालना : तालुक्यातील काही गावांमध्ये १० मार्च रोजी सायंकाळी अवकाळी पावसासह गारपीट होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी शनिवारी या परिसरातील शेतकऱ्यांनी राजूर रस्त्यावर दुपारी एक तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे रहदारी ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तांदुळवाडी खुर्द, घाणेवाडी, गुंडेवाडी, निधोना या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन द्राक्षे, डाळिंब, कांदा, गहू, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील विजेचे खांब कोलमडले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांच्या मालाचा मावेजा शासनाने देऊन मदत करावी. या भागातील शेतकऱ्यांना तातडीने मोबदला न दिल्यास यापुढेही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नायब तहसीलदार ढाकणे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे संतप्त आंदोलकांनी दिला. या आंदोलनात सुधाकर निकाळजे, नारायण गजर, मधुकर निकाळजे, बिभीषण कापसे, सुधाकर कापसे, मच्छिंद्र कापसे, काकासाहेब कापसे, सुदाम कापसे, नाथाजी कापसे, व्यंकटराव गायकवाड, विश्वजीत कापसे आदी सहभागी झाले होते.
गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By admin | Updated: March 15, 2015 00:36 IST