औरंगाबाद : आॅनलाईन संच मान्यतेसाठी शाळा तसेच विद्यार्थी पोर्टलमध्ये भरण्यात आलेल्या नोंदीच अंतिम समजल्या जाणार आहेत. तथापि, ‘स्टुडंट पोर्टल’ मध्ये विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची मुदत दिली असून, यासाठी शिक्षण विभागाने प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबाद जिल्ह्यापासून सुरुवात केली आहे. ‘स्टुडंटस् पोर्टल’मध्ये वर्गनिहाय विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी राज्यात सर्वप्रथम औरंगाबादपासून सुरुवात झाल्यामुळे जिल्ह्यातील जि. प., महापालिका, नगरपालिका, खाजगी, अशा सर्व व्यवस्थापनाच्या जवळपास ४ हजार शाळांमध्ये सध्या लगीनघाई सुरू झाली आहे. यामध्ये इयत्ता पहिलीच्या नवीन मुलांची माहिती शिक्षकांना भरावी लागणार आहे. याशिवाय तुकड्या अद्ययावत करणे गरजेचे आहे. घाई गडबडीत विद्यार्थ्यांची चुकलेली माहिती अपडेट करण्याची काळजी शिक्षकांना घ्यावी लागणार आहे.विशेष म्हणजे यंदापासून जवळपास सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे मुलाचे नाव शाळेत घालताना अनेक पालकांनी आधार कार्डचा क्रमांक दिला; पण तोच सध्या शिक्षकांची डोकेदुखी ठरतोय. पालकांनी आपल्या मुलांचे दिलेले आधार कार्ड क्रमांक जुळत नाहीत. साधारणपणे ८० टक्के विद्यार्थ्यांकडेच आधार कार्ड क्रमांक आहेत. त्यामुळे शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी आधार कार्ड उपलब्ध नसले, तर स्टुडंटस् पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती वेळेच्या आत भरण्याचे आवाहन सर्व शाळांना केले आहे. शिक्षण विभागाने प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबाद जिल्ह्याची निवड केली आहे. शिक्षण विभागाने औरंगाबादवर दाखविलेल्या विश्वासास पात्र राहण्यासाठी शिक्षणाधिकारी मोगल यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना मुदतीच्या आत माहिती नोंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अपुऱ्या माहितीअभावी २०१६-१७ च्या संच मान्यतेमध्ये अडचण आल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित शाळांची राहील, असा इशाराही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे. स्टुडंटस् पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्यास १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. यासंदर्भात सर्व गटशिक्षणाधिकारी व त्यांच्या खालच्या यंत्रणेस प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे माहिती अचूक भरणे अपेक्षित आहे. जि.प.च्या २ हजार १०६ शाळाजिल्ह्यात जि.प.च्या २ हजार १०६ शाळा कार्यरत असून, याव्यतिरिक्त महापालिका, नगरपालिका तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या दोन हजार शाळा आहेत. विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत केल्यानंतर शाळांची माहिती अद्ययावत केली जाईल. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी संच मान्यतेचा कार्यक्रम राबविला जाईल. ४गेल्या वर्षी संच मान्यतेला विलंब झाला होता. त्यावेळी औरंगाबाद जिल्ह्यात जि.प.च्या उर्दू व मराठी शाळांच्या संच मान्यतेमध्ये चुका झाल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
औरंगाबादपासून सुरुवात
By admin | Updated: September 11, 2016 01:23 IST