औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील निवासस्थानांची पार दुरवस्था झाली आहे. निवासस्थानावर झाडे वाढली असून, ठिकठिकाणी भेगाही पडल्या आहेत. निवासस्थानांच्या देखभाल आणि दुरुस्तीअभावी कर्मचारी व कुटुंबियांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे.मध्यवर्ती बसस्थानक परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रशासनालाही चालक-वाहक आणि अन्य कर्मचारी तात्काळ उपलब्ध व्हावेत, म्हणून बसस्थानकाजवळच उभारण्यात आलेले निवासस्थान महत्त्वाचे ठरते. या निवासस्थानांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. प्रत्येक पावसाळ्यात ठिकठिकाणी गळती लागत असल्याने येथील कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. बऱ्याच ठिकाणी प्लास्टर उखडले आहे. काही ठिकाणी भिंतीच्या जागेत मोठी झाडे उगवली आहेत. इमारतीला आणि इमारतीवरील पाण्याच्या टाकीला भेगा पडल्या आहेत. मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेवर बीओटी तत्त्वावर अद्ययावत आणि सुसज्ज बसस्थानक बांधताना निवासस्थान बांधण्याबाबत विचार करण्याची गरज असल्याचेही कर्मचाऱ्यांनी म्हटले. याविषयी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
एस.टी.च्या क्वॉर्टर्सला तडे व भेगा
By admin | Updated: October 6, 2014 00:42 IST