औसा : तालुक्यात यंदा खरीपाच्या उशिरा पेरण्या झाल्या़ त्यानंतर पावसाने उघाड देत पुन्हा रिमझिम हजेरी लावली़ ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव झाला़ या किडीपासून बचावासाठी शेतकरी गेल्या आठवड्यापासून सोयाबीनवर फवारणी करीत असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास दीड कोटी रुपये फवारणीवर खर्च केला आहे़ तालुक्यात ९८ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी झाली आहे़ यामधील ६० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आहे़ पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली़ जवळपास महिना- सव्वा महिन्याच्या कालावधीनंतर रिमझिम पावसाने हजेरी लावली़ दरम्यान, उगवलेली पिके वाळू नयेत म्हणून शेतकऱ्यांनी विहीर, कुपनलिकातील पाणी देऊन ती जगविली़ रिमझिम पावसाचा फायदा पिकांना झाला असला तरी ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव झाला़ त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून शेतकरी सोयाबीनवर अळीनाशक औषधांची फवारणी करीत आहेत़ एक एकर सोयाबीनवर फवारणी करण्यासाठी सरासरी १ हजार रुपये खर्च आहे़ या हिशोबाने तालुक्यात दीड कोटी रुपयांची शेतकऱ्यांनी फवारणी केली असल्याचे पहावयास मिळत आहे़ (वार्ताहर)
दीड कोटीची फवारणी
By admin | Updated: September 16, 2014 01:32 IST