रमेश शिंदे, औसातब्बल महिनाभर पाऊस लांबल्याने खरीप पेरण्यांना उशीर झाला आहे़ उडीद आणि मूग पेरणीचा कालावधी संपला असल्याने शेतकऱ्यांची भिस्त आता सोयाबीनवरच अवलंबून आहे़ त्यामुळे तालुक्यात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. एक लाख खरिपाचे क्षेत्र असलेल्या या तालुक्यात ५० हजार हेक्टर्सपेक्षा अधिक क्षेत्र सोयाबीनने व्यापणार आहे. घरगुती बियाण्यांच्या उपलब्धतेमुळे आणि कृषी विभागाच्या जनजागृतीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनच्या पेरणीकडे वळला आहे. औसा तालुका हा पावसाळी पाण्यावर अवलंबून असलेला तालुका. पण रोहिण्या, मृग आणि आर्र्द्रा ही पावसाळ्याची तिन्ही नक्षत्रे कोरडी गेली. पावसाअभावी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पुनर्वसू नक्षत्राने हात दिला. तालुक्याच्या काही भागात दमदार तर काही भागात साधारण पण पेरण्यायोग्य पाऊस झाला. आता शेतकरी पेरण्यांच्या लगबगीत आहे. मागील तीन-चार वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी यावर्षी तरी किमान वेळेवर पाऊस होईल, ही अपेक्षा ठेवून होता. पण पावसाळाच तब्बल महिनाभर लांबला. उडीद-मुगासारख्या पिकांची मृग-आर्द्रात पेरणी करणे अपेक्षित आहे. पण त्या पेरण्याच न झाल्यामुळे आता शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या पेरणीकडे वळला आहे.२०१२-१३ च्या खरीप हंगामामध्ये औसा तालुक्यात १ लाख ८९ हजार क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. त्यामध्ये ४६ हजार ४६० हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीन, ५ हजार ३७ हेक्टर्स क्षेत्रावर उडीद तर २ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली होती. तर २०१३-१४ च्या खरीप हंगामात ८३ हजार ६९९ हेक्टर्स क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. त्यामध्ये ३६ हजार २०० हेक्टर्सवर सोयाबीन, ८ हजार ३०० हेक्टर्सवर उडीद तर ३ हजार ९०० हेक्टर्सवर मूग या पिकांची पेरणी झाली होती. २०१२-१३ पेक्षा २०१३-१४ मध्ये उडीद-मुगाचे क्षेत्र वाढले होते. पण यावर्षी थोड्याफार प्रमाणात मुगाची पेरणी होताना दिसतेय. पण उडीद मात्र शून्यावर राहण्याची स्थिती आहे. उडीद-मूग या पिकाखालील क्षेत्र आणि पेरण्यांना उशीर झाल्यामुळे अन्य काही क्षेत्रही सोयाबीनखाली येण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या बियाण्याचे भाव यावर्षी मोठ्या प्रमाणावर वाढले. पण त्यापूर्वीच कृषी विभागाने शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे पेरावे म्हणून जनजागृती केली. तसेच बीज प्रक्रियेसंदर्भातही शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन मार्गदर्शन केले होते. त्यामुळे यावर्षी शेतकरी बियाणे विकत घेण्याऐवजी घरगुती वापरत आहेत. तर कृषी सेवा केंद्रांवर अजूनही मोठ्या प्रमाणात बियाणे शिल्लक असल्याचे पहायला मिळत आहे. उशिरा झालेला पाऊस आणि विलंबाने होणाऱ्या पेरण्या यामुळे तालुक्यात ५० हजार हेक्टर्सपेक्षा अधिक क्षेत्र हे सोयाबीनने व्यापणार आहे़शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी़़़ सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे सांगून पंचायत समितीचे कृषी अधिकारी सतीश शिंदे म्हणाले की, पण घरगुती बियाणे वापरताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. काही भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगला ओलावा झाल्यानंतरच पेरणी करावी. बियाणे पेरणी करताना जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी. बीज प्रक्रिया करताना बियाणाचे टरफल निघणार नाही, याचीही काळजी घेण्याचे आवाहन सतीश शिंदे यांनी केले आहे.
सोयाबीनवरच भिस्त !
By admin | Updated: July 12, 2014 01:14 IST