सोमनाथ लाहोरकर , हदगावहदगाव तालुक्यातील ८० हजार ४०० हेक्टर क्षेत्रफळापैकी ९ जुलैपर्यंत ४ हजार ९६० हेक्टर क्षेत्रफळात पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी डी़ एम़ तपासकर यांनी दिली़मागील ४५ दिवसांत २०़१७ मि़ मी़ पावसाची नोंद झाली असल्याची माहिती तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली़ मागील वर्षी मात्र जून महिन्यात १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या व ९ जुलैपर्यंत ३४० मि़ मी़ पावसाची नोंद झाली होती़ अद्याप पावसाळी वातावरण तयार झाले नसून पूर्ण शेतकरी वर्ग आकाशकडे डोळे लावून बसला आहे़ याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून ग्रामीण भाग यासह शहरी भागातील व्यवहार ठप्प झाला आहे़ जून महिन्यात कापसाचे अंदाजे पेरणीक्षेत्र २२ हजार ६०० हेक्टर असतेवेळी आजपर्यंत ४ हजार ५४६ हेक्टर पेरणी झाली आहे़ तर सोयाबीनचे पेरणीक्षेत्र ३१ हजार १०० हेक्टरपैकी फक्त ४१४ हेक्टर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ कापूस व सोयाबीनची ४ हजार ९६० हेक्टरवर पेरणी आटोपली असली तरी सोयाबीनचा सर्व केलेला पेरा हा पावसाच्या लहरीपणामुळे वाया गेला आहे़ तर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांचेच कापूस तग धरून आहे़ तर ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही त्यांच्यापुढे दुबार पेरणीचे संकट समोर आले आहे़तर मागील २०१३ या वर्षी आज तारखेपर्यंत ३४० मि़ मी़ पावसाची नोंद झाली होती़ तर यावर्षी २०़१७ मि़ मी़ पावसाची नोंद झाल्याने यावर्षीचा हंगाम शेतकऱ्यांना लाभदायक नसून भीतीदायक असल्याची प्रतिक्रिया हदगाव येथील प्रगतशील शेतकरी गणेश तोष्णीवाल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़कृषी अधिकारी डी़ एम़ तपासकर यांना सध्याच्या परिस्थितीत कोणते पीक घ्यावे असे विचारले असता ते म्हणाले, येत्या १५ जुलैपर्यंत पाऊस झाला तर सर्वच पिके घेता येतील, पण मूग, उडीद हे पीक घेता येणार नाहीत़ जर २० जुलैच्या पुढे मात्र कापूस, सोयाबीन पिकाची पेरणी झाली तर यात उत्पन्नात घट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ यासाठी येरंडा, सूर्यफूल, मका अशी उशिरा येणारी पिके घेतली तर फायदा होवू शकतो, असेही त्यांनी सांगितले़ यावेळी निवघा मंडळ कृषी अधिकारी वसंतराव देशमुख, हदगाव मंडळ कृषीअधिकारी मुंढे, तामसा मंडळ कृषीअधिकारी एम़ एऩ हुसेन हे उपस्थित होते़
केवळ पाच हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी
By admin | Updated: July 11, 2014 01:02 IST