औरंगाबाद : शेंद्रा औद्योगिक वसाहतीलगतच्या ९ गावांचा (नवनगर) झोन प्लॅन मंजूर झाल्याने या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. नवनगरमध्ये प्रत्येक मोठ्या रस्त्याचे विस्तीर्ण जाळे असणार आहे. याशिवाय खेळाची मैदाने, उद्याने, फायर ब्रिगेड, शाळा, हॉस्पिटल्स, वाचनालये तसेच वॉटर ट्रीटमेंट प्लांटसारख्या शहरस्तरीय सुविधांसाठी जमिनींचा वापर निश्चित करण्यात आला. झोन नकाशामध्ये फक्त शासकीय जमिनींवरच शहरस्तरीय सुविधा प्रस्तावित केल्या असून त्यासाठी एकूण ८५ हेक्टर जमीन वापरली जाणार आहे.शहराजवळच्या २८ गावांचा झालर क्षेत्र विकास आराखडा काही वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे या गावांमध्ये विकासाची गती काहीशी मंदावली आहे, असे असतानाच शेंद्रा एमआयडीसीभोवतीच्या ९ गावांसाठी स्वतंत्र झोन प्लॅन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता या क्षेत्रात विकासाला चालना मिळणार आहे. ९ गावांचा हा भाग यापुढे नवनगर म्हणून ओळखला जाणार आहे. या नवनगरमध्ये शेंद्रा जहांगीर, शेंद्राबन, गंगापूर जहांगीर, वरुडकाझी, लाडगाव, करमाड, टोणगाव, हिवरा आणि कुंभेफळ ही गावे समाविष्ट आहेत.