जालना : दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाच्या जालना आगारात रविवारी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. बसेसअभावी शेकडो प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले. दिवाळीनिमित्त जादा बसगाड्या सोडणाऱ्या एसटी महामंडळाचा दावा फोल ठरल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. दिवाळी संपल्याने अनेक चाकरमाने तसेच सरकारी नोकरदार व विद्यार्थ्यांसह शेकडो प्रवाशांनी बसस्थानकात मोठी गर्दी केली होती. गर्दीच्या तुलनेत व काही मार्गावर बसेसच नसल्याने अनेकांना दोन टप्प्यांत गावी पोहचावे लागले. प्रवासी भारमान वाढल्याने बसमध्ये बसण्यासाठीही जागा नसल्याने अनेकांनी खाजगी वाहनांचा आधार घेत आपले गाव गाठले. जालना आगारातून विदर्भातून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता चार आगर मिळून ४० पेक्षा अधिक बसेसची व्यवस्था केली होती. असे असले तरी गर्दी वाढल्याने तसेच केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी न झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. जालना आगारातून औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, बीड, सोलापूर आदी मार्गावर पुरेशा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आल्याचे आगारप्रमुख एस. जी. मेहेत्रे यांनी सांगितले. विदर्भासाठी दहा पेक्षा अधिक जास्त गाड्या नियोजित केल्या होत्या. त्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रवासी संख्या वाढल्याने काहीअंशी गैरसोय झाली असली तरी एसटी महामंडळाकडून चांगले नियोजन केल्याचे मेहेत्रे म्हणाले. जालन्यासोबतच अंबड, परतूर, जाफराबाद, मंठा, भोकरदन बसस्थानकांत प्रवाशांची संख्या लक्षणीय होती. (प्रतिनिधी)दिवाळी सुटीनिमित्त प्रवासी भारमान वाढल्याने जालना आगारातून पंधरापेक्षा अधिक बसचे नियोजन केल्याचे आगारप्रमुख एस.जी. मेहेत्रे यांनी सांगितले. दिवाळीत प्रवासी भारमान ६५ वर गेले आहे. रविवारी प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे सांगून विदर्भ तसेच सोलापूर, पूणे या मार्गावर गाड्या वाढविण्यात आल्या.एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये पाय ठेवण्यासही जागा नसल्याने अनेकांनी खाजगी कार, जीप करून जाणे पसंत केले. यामुळे खाजगी वाहनचालकांची चांगलीच चांदी झाली. अनेकजण दिवाळी सुटीनिमित्त खाजगी वाहने पर्यटनाला गेल्याने खाजगी प्रवासी वाहनांची चांगलीच मागणी वाढली होती.
बसेसअभावी प्रवाशांचे हाल
By admin | Updated: November 16, 2015 00:37 IST