परंडा : जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी मंगळवारी शिवसेनेला पाठिंबा दिलेला असतानाच बुधवारी भाजपा-रासपाला आणखी एक धक्का बसला. परंडा येथील रिपाइंचे प्रदेश सचिव संजयकुमार बनसोडे यांनी भाजपा-रासपाकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचे सांगत शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय जाहीर केला. बुधवारी दुपारी बनसोडे यांच्या निवासस्थानी रिपाइंच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. दोन दिवसांपूर्वी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची परंडा येथे जाहीर सभा झाली. या सभेत व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर रिपाइं नेते खा. रामदास आठवले यांचे छायाचित्र नव्हते. याबरोबरच सभास्थळी इतर पक्षाचे ध्वज असताना रिपाइंचा निळा ध्वजही लावला नसल्याने सन्मानाची वागणूक मिळणार नसेल तर युती कशासाठी, ठेवायची, असा सवाल कार्यकर्त्यांनी विचारला. बैठक सुरू असतानाच काही वेळाने शिवसेना उमेदवार ज्ञानेश्वर पाटील बैठक स्थळी आले. शिवसेनेकडून रिपाइच्या नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिल्यानंतर रिपाइंचे नेते बनसोडे यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. या बैठकीला रिपाइंचे तालुकाध्यक्ष दीपक गायकवाड, फकिरा सुरवसे, सिध्दार्थ शिंदे, गौतम पालके, आकाश बनसोडे, अर्जुन वस्ताद, उत्तम ओहाळ, नितीन दाभाडे, हरिभाऊ आढागळे, दीपक ठोसर, सरपंच पोपट ओहाळ, जयराम साळवे, भगवान भोसले यांच्यासह ४८ गावातील रिपाइंच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान, बैठकीनंतर शेळगाव येथे झालेल्या शिवसेना उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांच्या जाहीर सभेला संजयकुमार बनसोडे पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहिले. (वार्ताहर)
परंड्यात रिपाइं शिवसेनेसोबत
By admin | Updated: October 9, 2014 00:37 IST