लोहारा : मोघा (बु़) ते वाडीवडगाव रस्त्याच्या कडेला एका युवतीचा मृतदेह आढळून आला होता़ घटनास्थळाजवळ पोलिसांना सापडलेल्या सीमकार्डवरून त्या तरुणीची ओळख पटली असून, ती बिहारमधील शिवाण येथील संगितादेवी रमेश पाल (वय-२२) असल्याचे सूत्रांनी सांगितले़मोघा बुद्रूक ते वाडीवडगाव रस्त्याच्या कडेला मंगळवारी रात्री एका तरूणीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता़ घटनास्थळी दाखल पोलिसांनी तरूणीच्या अंगावर अॅसिड टाकून किंवा तिला गळफास लावून ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज बांधला होता़ घटनास्थळाच्या पाहणीवेळी एक सीमकार्ड पोलिसांना सापडले होते़ या सीमकार्डची तपासणी केली असता ती मयत तरूणी शिवाण (बिहार) येथील असल्याचे समोर आले आहे़ ती खेड येथील लोकमंगल साखर कारखान्यावर कामासाठी आली होती़ ती विवाहित असून, तिची बहिण शकुंतला राघव पाल यांच्याकडे ९ जानेवारी रोजी आली होती़ त्यानंतर ती बहिणीला न सांगता १४ जानेवारी रोजी निघून गेली होती, अशी माहिती पोलिसांना तपासादरम्यान समजली आहे़ पोलिसांनी विविध पथके तपासासाठी पाठविले असून, लवकरच आरोपित गजाआड होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे़
‘ती’ युवती बिहारमधील
By admin | Updated: January 23, 2015 00:55 IST