हणमंत गायकवाड , लातूरशेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर या ना त्या कर्जाचा बोजा आहेच. लातूर तालुक्यातील ३१ हजार ८७२ सातबाऱ्यांपैकी@२८ हजार ८५४ सातबारे कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. पीककर्जाचा बोजा उतरत नाही तोवर शेती औजारांच्या कर्जाचा बोजा त्यावर टाकलेला असतो. त्यातच सोसायट्या व बँक कर्जांचे ओझेही सातबाऱ्यावर असल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला आहे.लातूर तालुक्यात एकूण ८ महसूल मंडळे असून, तलाठी सज्जा ४६ आहेत. तर गावांची संख्या ११८ आहे. या सर्व गावांतील शेतकऱ्यांच्या सातबारावर वेगवेगळ्या कर्जांचा डोंगर उभा आहे. ३१ हजार ८७२ सातबाऱ्यांपैकी सरासरी १० टक्के सातबारा बोजा नसणारे आहेत. उर्वरित सर्व सातबाऱ्यांवर पीककर्ज, शुभमंगल योजनेचे कर्ज, शेती औजारांचे कर्ज, सिंचन कर्ज, फळबाग लागवड कर्ज, पाईपलाईन कर्ज, सिंचन विहिरीचे कर्ज, बी-बियाणे व लागवड कर्जांचा बोजा आहे. ३१ हजार ८७२ सातबाऱ्यांपैकी केवळ ३ हजार १८ सातबाऱ्यांवर कर्जाचा बोजा नाही. सदर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी असल्यामुळे या शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा नसावा, असे मंडळ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लातूर महसूल मंडळात एकूण सात गावे असून, ७५२ सातबारे आहेत. त्यापैकी ८७ टक्के सातबाऱ्यांवर वेगवेगळ्या कर्जांचा बोजा आहे. केवळ १३ टक्के सातबाऱ्यांवर कर्जाचा बोजा नाही. मुरुड महसूल मंडळात एकूण १२ गावे असून, ४७६६ सातबारे आहेत. त्यापैकी १० टक्के सातबारावर कर्जाचा बोजा नाही. ४ हजार ७६६ पैकी ४६३ सातबाऱ्यांवर बोजा नसल्याचे मंडळ अधिकारी सांगतात. उर्वरित सर्व सातबाऱ्यांवर कर्जाचा डोंगर आहे. तांदुळजा, गातेगाव, बाभळगाव, हरंगुळ (बु.), चिंचोली (ब.), कासारखेडा या महसूल मंडळांतील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरही बोजा असून, सरासरी ९ टक्के सातबारे वगळता ९१ टक्के सातबाऱ्यांवर वेगवेगळे कर्ज आहे. ९९ टक्के सातबाऱ्यांवर पीककर्जाचा बोजा आहे. शिवाय, बी-बियाणे, औजारे, सिंचन, फळबाग लागवड, पाईपलाईन आदी कारणांसाठी शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचा बोजा सातबाऱ्यावर लावला आहे. ४मुरुड महसूल मंडळाचे अधिकारी भीमाशंकर बेरुळे म्हणाले, मुरुड मंडळात एकूण १२ गावे आहेत. या १२ गावांपैकी असे एकही गाव नाही की ज्या गावांत शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा नाही. ४७६६ पैकी १० टक्के सातबारावर कर्जाचा बोजा आहे. गरज म्हणूनच शेतकऱ्यांनी कर्जाचा बोजा सातबारावर लावला असल्याचे बेरुळे म्हणतात. ४लातूर महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी पी.एम. जाधव म्हणाले, लातूर मंडळात सात गावे असून, ७५२ सातबारे आहेत. या सातबाऱ्यांपैकी केवळ ९ टक्के सातबारे कोरे आहेत. त्यावर कर्जाचा बोजा नाही. उर्वरित सर्व सातबाऱ्यांवर कर्जाचा बोजा आहे. ४बाभळगाव महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी के.एन. कुलकर्णी म्हणाले, मंडळात एकूण १७ गावे आहेत. सर्वच गावांतून शेतकऱ्यांनी कर्जाचा बोजा सातबारावर लावला आहे. ७ टक्के सातबारे कर्जाविना असतील, उर्वरित सर्व सातबाऱ्यांवर कर्ज घेतलेले आहे. ४तांदुळजा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी ए.एच. शेख म्हणाले, मंडळात एकूण १९ गावे आहेत. ऊस लागवडीसाठी बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जाचा बोजा सातबारावर लावला आहे. सोसायट्यांसह अन्य बँकांचेही कर्ज सातबाऱ्यावर आहे. ९० टक्के सातबाऱ्यांवर बोजा आहे. १० टक्के सातबारे बोजा नसलेले आहेत. ४हरंगुळ (बु.) महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी जे.एस. उगिले म्हणाले, मंडळात एकूण ११ गावे असून, या मंडळात सगळ्यात जास्त पीककर्ज आहे. मागच्या कर्जाची फेड आणि नवीन पीककर्ज अशा चक्रव्यूहात शेतकरी अडकला आहे. मंडळात ७ टक्के सातबारे वगळता अन्य सर्व सातबारांवर बोजा आहे. ४गातेगाव महसूल मंडळाच्या विद्या गिरी म्हणाल्या, ५ टक्के सातबारे वगळता अन्य सर्वच सातबाऱ्यांवर बोजा असून, हे कर्ज फेडण्यातच शेतकऱ्यांची मेहनत वाया जात आहे. उत्पन्नापेक्षा कर्ज जास्त असल्याने शेतकरी अडचणीत आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच !
By admin | Updated: December 18, 2014 00:37 IST