जालना : लोकसभा निवडणूक २०१४ ची मतमोजणी प्रक्रिया सलग सात तास चालली. शुक्रवारी औरंगाबाद रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात झालेल्या या प्रक्रियेत जालना, भोकरदन, फुलंब्री, सिल्लोड व पैठण या पाच विधानसभा मतदारसंघांच्या २२ तर बदनापूर मतदारसंघाच्या २५ फेर्यांची मतमोजणी सलग सात तासानंतर पूर्ण झाली. या प्रक्रियेवर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी ए.एस.आर.नायक हे नियंत्रण ठेवून होते. मतमोजणी करताना ४०० अधिकारी, कर्मचार्यांची सरमिसळ करण्यात आली होती. विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबलवर ही प्रक्रिया सुरू होती. शासकीय तंत्रनिकेतन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जालना, भोकरदन, सिल्लोड आणि फुलंब्री तर दुसर्या मजल्यावर बदनापूर आणि पैठण विधानसा मतदारसंघातील मतमोजणीचे काम सुरू होते. पाच विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या २२ फेर्या तर बदनापूर मतदार संघात मात्र २५ फेर्या झाल्या. तळमजल्यावर निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय होते. आतील मोकळ्या जागेत माध्यम कक्ष आणि राखीव कर्मचार्यांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या परिसरात ३०० पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात होते. तर केंद्रीय राखीव दलाच्या जवानांची तुकडीही बंदोबस्तकामी लावण्यात आली होती. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश जोशी हे प्रत्येक टेबलास भेट देऊन तेथील पाहणी व आवश्यक सूचना करीत होते. मतमोजणीच्या प्रत्येक टेबलला एक सूक्ष्म निरीक्षक प्रत्येक मतांच्या मोजणीवर बारीक लक्ष ठेवून होते. सूक्ष्म निरीक्षक म्हणून केंद्र सरकारचे व राष्ट्रीयकृत बँकेचे कर्मचारी अधिकारी यांचा समावेश होता. कडेकोट सुरक्षा व्यवस्था या मतमोजणी प्रक्रियेत अप्पर जिल्हाधिकारी वामन कदम, उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा कोषागार अधिकारी कल्याण औताडे, भूसंपादन अधिकारी भारत कदम, रोहयो उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे, तहसीलदार जे.डी. वळवी आदी अधिकार्यांनी सहभाग नोंदविला. महावितरणचे अभियंता चंद्रकांत दुब्बा यांच्यासह पथकाने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक वसंत परदेशी हेही मतमोजणी केंद्र व परिसरात लक्ष ठेवून होते. माध्यम कक्षात संगणक, फॅक्स, इंटरनेट, फोन, टीव्ही, आदींची सोय होती.
२५ फेर्यांच्या मतमोजणीच्या निकालासाठी लागले सात तास
By admin | Updated: May 17, 2014 00:20 IST