चाकूर : चाकूर शहरात चोऱ्यांचे सत्र अद्याप सुरुच आहे़ शहरातील आदर्श कॉलनी भागातील दोन घरांचे कुलूप तोडून घरातील सोन्यांचे दागिण्यांसह रोख असा ३ लाख २१ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला़ ही घटना मंगळवारी पहाटे घडली़ चाकूर शहरात यापूर्वी झालेल्या चोऱ्या, दिवसाढवळ्या चोऱ्यांचा एकही तपास करण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही़चाकूर येथील आदर्श कॉलनीत मुलांच्या शिक्षणासाठी भाड्याने घर घेऊन तालुक्यातील आटोळा येथील सोमनाथ प्रभू शेटे हे राहतात़ दिवाळीनिमित्त घराला कुलूप लावून ते कुटुंबियांसह गावाकडे गेले होते़ या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शेटे यांच्या घराचे कुलूप तोडले़ घरात प्रवेश केला घरातील दोन पेटीत ठेवलेले सोन्याच्या ४ ग्रॅम तोळ्याच्या पाटल्या़ ४ ग्रामचे २ अंगठ्या, पिंपळपान, नथनी, अंगठी, लॉकेट, चांदीचे दागिणे, रोख १० हजार रूपये असे १ लाख ९६ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केले़ तर याच भागात राहणारे अॅड़ जयप्रकाश बेंजरगे यांच्याही घरचे कुलूप तोडून कपाटातील लॉकरमधील अडीच तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, झुमके, लहान मुलाचे लॉकेट व रोख १५ हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले़याप्रकरणी शेटे व बेंजरगे यांनी चाकूर पोलिसांत रितसर फिर्याद दाखल केली़ या प्रकरणी कलम ४५७, ३८० भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या दोन चोऱ्यांशिवाय अन्य एका घरीही चोरट्यांनी चोरी केली आहे़ सपोनि़ एस़एल़लहाने यांनी तात्काळ श्वान पथकास पाचारण केले़ चाकूर शहरात यापूर्वी दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अनेक चोऱ्या झाल्या़ यातील गुन्हेगारांना शोधून काढण्यास चाकूर पोलिस अपयशी ठरल्याने शहरवासियांत भितीचे वातावरण पसरले आहे़ त्यामुळे या वाढत्या चोऱ्यांचा बंदोबस्त करावा़(वार्ताहर)
चाकुरात चोऱ्यांचे सत्र सुरुच
By admin | Updated: October 29, 2014 00:45 IST