फकिरा देशमुख, भोकरदनजनतेची सेवा करीत राहा, आणखी मोठे पद मिळेल असा मातृवत्सल आशीर्वाद रावसाहेब दानवे यांना त्यांच्या मातोश्रींनी आज दिला. मुलगा मंत्री होऊन लाल दिव्याची गाडी घेऊन आईला भेटायला आला तेव्हा ९० वर्षीय आईच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. या माय लेकराच्या भेटीने वातावरण अतिशय भावूक बनले होते.एकेकाळी राजकारणात जाण्यास घरातूनच विरोध असताना सुध्दा रावसाहेब दानवे यांनी राजकाराणात उडी घेऊन यशाचे शिखर गाठले. त्यानंतर लहान मोठे सर्व पदे त्यानी भूषविली. दानवे हे १९९० ला पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर १९९५ ला दुसऱ्यांदा आमदार झाले व त्यानंतर सलग चार वेळा खासदार होण्याचा बहुमान जालना लोकसभा मतदार संघात दानवे यांना मिळाला. एवढेच नाही तर नरेंद्र मोदी यांचा मंत्रिमंडळात दानवे यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. मंत्री झाल्यानंतर दानवे यांचा २४ जून रोजी जवखेडा खुर्द या २०० कुटुंबे व १००० हजार लोकवस्ती असलेल्या जन्मभूमीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दानवे यांनी यावेळी आई केसराबाई यांचे दर्शन घेऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या. आईच्या तब्येतीची विचारपूस केली. केसराबाई दानवे हे गेल्या काही महिन्यांपासून वृध्दापकाळाने आजारी आहेत. केसराबाईनी आपले दु:ख बाजूला ठेवून दानवे यांच्या तोंडावरुन मायेचा हात फिरविला. यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केली. तसेच तुझ्याकडे काय काम आहे कोणत्या विभागाचा तू मंत्री झाला यांची माहिती घेतली. जनतेची सेवा कायम करीत रहा तुला देव आणखी मोठ्या पदावर पोहोचवील असे सांगितले. यावेळी निर्मलाताई रावसाहेब दानवे यांच्यासह त्याच्या जवखेडा खुर्द येथील परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी मधुकर दानवे यांनी सांगितले की दादा येणार आहे हे आईला सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तर काहींनी यावेळी विनोद सुध्दा केले यावेळी दानवे यांनी दोन तास आपल्या कुटुंबा सोबत जवखेड्यात घालविले व सर्व लहान मोठ्यांची भेट घेतली़
जनतेची सेवा कर, आणखी मोठे पद मिळेल
By admin | Updated: June 28, 2014 01:17 IST