नांदेड : पंचायत समितीत काँग्रेसचे चंदर बुक्तरे यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गोपाळराव कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ या निवडणुकीत शिवसेनेने सपशेल माघार घेत निवडणुकीत भागच घेतला नाही़ इतकेच नव्हे, तर एकाही सदस्याने पंचायत समितीतही हजेरी लावली नाही़ आठ सदस्य असलेल्या नांदेड पंचायत समितीत काँग्रेसचे चार, शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे़ कॉंग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत या पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली होती़ तोच कित्ता यावेळीही गिरवत राष्ट्रवादीला उपसभापतीपद देत काँग्रेसने नांदेड पंचायत समितीवरील आपली सत्ता कायम ठेवली आहे़ नांदेड पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव सुटले होते़ या जागेसाठी काँग्रेसचे कामठा बु़ गणातील चंदर बुक्तरे हे एकमेव सदस्य पात्र होते़ त्यामुळे या पदासाठी काँग्रेसकडून त्यांचा अर्ज दाखल झाला होता़ तर उपसभापतीपदासाठी पंचायत समितीत राष्ट्रवादीचे असलेले एकमेव सदस्य गोपाळराव कदम यांची दुसऱ्यांदा उपसभापतीपदी वर्णी लागली़ सलग पाच वर्षे उपसभापती म्हणून त्यांना संधी मिळणार आहे़ शिवसेनेकडून या निवडणुकीत अध्यक्ष अथवा उपाध्यक्षपदासाठीही अर्ज भरण्यात आला नाही़ त्यामुळे दुपारी १२ वाजता ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले़ दुपारी २ वाजता पंचायत समिती सभागृहात पिठासीन अधिकारी महादेव किरवले यांच्या उपस्थितीत या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली़ गटविकास अधिकारी डॉ़ नामदेव केंद्रे यांचीही उपस्थिती होती़ मावळते सभापती बंडू पावडे, शेख युसूफ, विद्याताई कडेकर यांची उपस्थिती होती़ निवडीसाठी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक म्हणून किशोर स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली होती़ काँग्रेस तालुकाध्यक्ष मोतीराम पाटील, पिंकू पोकर्णा, आनंदा गुंडिले, बाबूराव शिंदे, बाबूराव कासारखेडेकर, माधव वायवळे, बालाजी श्ािंदे, मुधकर पाटील, चांदू पाटील वाडेकर, जमील सेठ, आनंदराव पुयड, रावसाहेब पुयड, श्रावण पाटील आदींची उपस्थिती होती़ निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सभापती चंदर बुक्तरे यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पालकमंत्री डी़ पी़ सावंत, आ़ ओमप्रकाश पोकर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना मिळालेल्या या संधीचा सामान्यांच्या विकासासाठी उपयोग करणार असल्याचे सांगितले़ तर उपसभापती गोपाळराव कदम यांनीही विकासासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले़ माजी सभापती बंडू पावडे यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीत सर्वांच्या सहकार्याने चांगले काम करता आल्याचे सांगितले़ (प्रतिनिधी)संपूर्ण जिल्ह्यात पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीपदासाठी गेल्या १५ दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला होता़ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या नांदेड पंचायत समितीत शिवसेनेकडे अध्यक्षपदासाठी उमेदवार नसला तरी उपाध्यक्षपदासाठी अर्ज का केला नाही? हा प्रश्न शिवसेनेतूनच पुढे येत आहे़ शिवसेनेच्या सत्वशीला बोकारे, प्रेमलाबाई मोरे आणि सोनाबाई येडे हे तीनही सदस्य या निवडणुकीत गैरहजर राहिले़ राष्ट्रवादी काँग्रेसचा नांदेड पंचायत समितीत एकच सदस्य गोपाळराव कदम यांच्या रूपात निवडून आला आहे़ मात्र काँग्रेस आघाडीच्या राजकारणात त्यांना सलग पाच वर्षे उपसभापतीपद भूषविण्यास मिळणार आहे़ अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असताना रविवारी झालेल्या निवडणुकीत कदम हे पुन्हा उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आले़
सेनेची सपशेल माघार
By admin | Updated: September 14, 2014 23:36 IST