निवृत्ती भागवत, शंकरनगरदिवसेंदिवस इंग्रजी शाळांकडे वाढत जाणारी पालकांची ओढ यामुळे मराठी शाळांना विद्यार्थी मिळणे अवघड होवून बसले आहे़ त्यामुळे या शाळांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे़ मराठी शाळा टिकवून ठेवायच्या असतील तर त्यांना सेमी इंग्रजीचा आधार देणे हाच एकमेव पर्याय आहे़जोपर्यंत विनाअनुदानित डी़ एड़, बी़ एड़ चा बाजार सुरू झाला नव्हता तोपर्यंत ग्रामीण भागातील गोरगरीबांची मुले-मुली शहरी भागातील मुलींची ओढ डी़ एड़, बी़ एड़ कडे होती़ उत्तीर्ण उमेदवारांची संख्या कमी असल्यामुळे उमेदवारांना डी़ एड़, बी़ एड़ नंतर लवकरच नोकऱ्या लागत असत़ त्यामुळे मुला-मुलींचा ओढा डी़ एड़, बी़एडक़डे अधिक होता़ डी़एड़, बी़एड़ प्रवेशासाठी अन्य शाखांच्या तुलनेत कला शाखेला अर्थात मराठी भाषेला प्राधान्य होते़ १९९० नंतर राज्य शासनाने जवळच्या नातेवाईकांना, कार्यकर्त्यांना विनाअनुदानित डी़एड़, बी़एड़ची खैरात वाटली़ अनेक खाजगी दुकाने निघाले़ संस्थाचालकांचे उखळ पांढरे झाले आणि विद्यार्थी बेरोजगार होवून रस्त्यावर फिरू लागले़ आता कोणीही डी़एड़ प्रवेशाचे नाव घेताना दिसत नाही़ भूछत्राप्रमाणे उगवलेल्या संस्था बंद होवू लागल्या आहेत़ डी़एड़नंतर सीईटी देवूनही अनेकांना बेरोजगार म्हणून फिरावे लागत असल्याचे लक्षात आल्यामुळे डी़एड़चा ओढा कमी झाला़ चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना काहीतरी पर्याय पाहिजे होता़ तो मेडिकल, इंजिनिअरींगच्या रुपाने त्यांच्यासमोर आला़ हा पर्याय लक्षात येताच पालक व विद्यार्थ्यांची इकडे प्रवेशासाठी झुंबड उडाली़ जि.प.प्रशासनाने सर्व खाजगी शाळांना पहिलीपासून सीबीएसी पँटर्नची मान्यता देवून सेमी इंग्रजी सुरु करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. पालकांची मानसिकता मेडिकल, इंजिनिअरींगचा इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम सहज, सोपा वाटावा म्हणून पहिलीपासूनच इंग्रजी शाळेत मुलांना पाठविण्याची पालकांची मानसिकता तयार झाली़ सुरुवातीला पाचगणी, प्रवरानगर, डेहराडूनसारख्या ठिकाणी नामवंत इंग्रजी शाळा होत्या़ त्यात अनेक इंग्रजी शाळांची भर पडली़ सध्या रस्तोरस्ती गल्लोगल्ली इंग्रजी शिक्षणाची दुकाने थाटलेली दिसून येत आहेत़ अशा शाळांमध्ये विषयतज्ज्ञ शिक्षक, योग्य व पुरेसे शैक्षणिक साहित्य, क्रीडांगण, इमारत व सोयीसुविधा आहेत की नाही याची पालक चौकशी न करताच मुलांना प्रवेश देत आहेत़इंग्रजी शिक्षणाकडे गेल्या पालकांचा, बालकांचा ओढा वाढल्यामुळे जि़ प़ व खाजगी संस्थांच्या अनेक शाळांना विद्यार्थीच मिळेनासे झाले आहेत़ मोफत पाठ्यपुस्तके, दोन-दोन गणवेश अशी प्रलोभने देवूनही विद्यार्थी मिळत नसल्याने मराठी माध्यमांच्या शाळांसमोर अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला.
मराठी शाळा वाचविण्यासाठी सेमी इंग्रजीचा पर्याय
By admin | Updated: July 10, 2014 00:44 IST