पानगाव : जिल्हा बँकेच्या पानगाव शाखेत गेल्या पंधरा दिवसापासून चलन तुटवडा सुरु असून, यामुळे बहुतांश खातेदारांच्या खात्यावर पैसे असतानाही त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे़ ऐन लग्नसराईत बँकेत चलनाचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्राहकांची गैरसोय होत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ परिसरातील फावडेवाडी, मुसळेवाडी, रामवाडी, भंडारवाडी, मुरढव, पाथरवाडी, कोष्टगाव, दिवेगाव, रामवाडी, नरवटवाडी, पानगाव आदी गावातील बहुतांश नागरिकांचा व्यवहार या बँकेशी निगडीत असून, यात शेतकरी, सरकारी नोकरदार व अन्य नागरिकांचा समावेश आहे़ बँकेत ठेवीदारांची संख्या मोठी असून, शिवाय शिक्षकांच्या पगारीसुद्धा याच बँकेतून होत असतात़ बँकेचे जवळपास १० हजार खातेदार असून, ३ हजार कर्जदार आहेत़ कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना सेवा, कर्जाचे वाटप करण्यात आले असून, लग्नसराईचा महिना असल्यामुळे बँकेतून पैसे काढणाऱ्या खातेदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे़ बँकेत खातेदारांनी जास्त रकमेची मागणी केली असता त्यांना कमी पैसे देऊन त्यांची बोळवण केली जाते़ बँकेत पैसे असतानाही ग्राहकांना हा त्रास सहन करावा लागत आहे़ मार्च-एप्रिल महिन्यात बँकेत चलनाचा तुटवडा असतो़ मुख्य शाखेत जेवढी रकमेची मागणी करतो, तेवढी मिळत नसल्याने शाखेत चलन तुटवडा जाणवत आहे़ तरी ग्राहकांची गरज ओळखून आम्ही पैसे देत असल्यचे शाखाधिकारी पांचाळ यांनी सांगितले़(वार्ताहर)
पानगाव शाखेत पैशाची टंचाई
By admin | Updated: April 22, 2015 00:39 IST