औरंगाबाद : टपाल खात्याची परीक्षा देण्यासाठी शहरात आल्यानंतर परीक्षा केंद्र गाठताना आणि पेपर झाल्यानंतर बसस्थानक आणि रेल्वेस्थानकावरून परतीचा प्रवास करताना विद्यार्थी आणि पालकांची रविवारी मोठी तारांबळ झाली. परीक्षेसाठीचा हा प्रवास सगळ्यासाठी परीक्षेचा ठरला. टपाल खात्यात विविध पदे भरण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. मराठवाडा, विदर्भ आणि इतर ठिकाणांसह १३ जिल्ह्यांतील विद्यार्थी या परीक्षेसाठी शहरात आले होते. अनेक विद्यार्थ्यांसह पालक आणि त्यांचे नातेवाईकही आले होते. रेल्वे आणि एस. टी. ने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आले होते. शहरात दाखल झाल्यानंतर परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी त्यांना रिक्षांचा आधार घ्यावा लागला. दुपारी दोन ते चार यावेळेत ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षा संपल्यानंतर मात्र, परिस्थिती आणखीन बिकट झाली. रेल्वेस्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानक गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना रिक्षांची शोधाशोध करावी लागली. अनेकांनी पायीच रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक गाठले. सायंकाळी एकाच वेळी हजारो परीक्षार्थ्यांची रेल्वेस्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दी झाली. रेल्वेस्थानकावर मराठवाडा एक्स्प्रेसने जाण्यासाठी आलेल्या विद्यार्थी, पालकांची प्रचंड गर्दी दिसून आली. संपूर्ण स्थानक गर्दीने खचाखच भरले होते. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर ही रेल्वे आल्यानंतर आतमध्ये जाण्यासाठी आणि जागा मिळविण्यासाठी एकाच वेळी झुंबड उडाली. त्यामुळे उतरणार्या प्रवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांमध्ये यावेळी वादही झाले. रेल्वेत बसण्यासाठी अनेकांनी आपत्कालीन खिडकीचा आधार घेतला. गर्दीमुळे निघालेली रेल्वे दोन वेळा थांबविण्यात आली. दरवाजात लटकून अनेकांनी परतीचा प्रवास केला.
परीक्षेसाठी प्रवास करणार्यांची झाली ‘सत्त्वपरीक्षा’
By admin | Updated: May 12, 2014 00:41 IST