पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचेच : ओबीसी, मराठा आरक्षणावर बोलू देण्याची मागणी
औरंगाबाद : ओबीसी आरक्षणासाठी शनिवारी भाजपाने राज्यभर चक्काजाम आंदोलन केल्यामुळे मराठा समाज आरक्षणासाठी पक्ष रस्त्यावर उतरणार काय? असा सवाल भाजप पदाधिकाऱ्यांना विचारण्यात येत आहे. मराठा आरक्षणासाठीदेखील भाजप रस्त्यावर उतरणार असून, त्यासाठी आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच सरकारने मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत येत्या अधिवेशनात बोलू दिले पाहिजे, मात्र सरकारने दोनच दिवस अधिवेशन चालेल, अशी नोटीस काढली असून, त्यात पुरवणी व पटलावरील विषयांवरच चर्चा होईल, असे जाहीर केल्यामुळे सरकारच याबाबत गंभीर नसल्याचा आरोपही भाजपच्या गोटातून करण्यात येत आहे. या दोन्ही समाज घटकांबाबत नेमके काय चालले आहे, हे समोर येण्यासाठी सरकारने बोलू दिले पाहिजे, अशी भाजपची मागणी आहे.
आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका
माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी सांगितले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच आमची भूमिका आहे. आरक्षणासाठी पक्ष आंदोलन करणारच आहे. परंतु तत्पूर्वी सरकारने अधिवेशनात भूमिका मांडू दिली पाहिजे. मराठा, ओबीसी आरक्षणावर चर्चा हाेणे गरजेचे आहे.
आंदोलनाची तयारी सुरू आहे
आमदार अतुल सावे यांनी सांगितले, मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात भाजप सुरुवातीपासून आहे. आरक्षणासाठी सर्वांत जास्त परिश्रम भाजपाने घेतले आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी भाजप रस्त्यावर उतरणार असून, आंदोलनाची तयारी सुरू आहे.
भाजप मराठा आरक्षणाच्या बाजूने
जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी सांगितले, भाजप मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या बाजूने आहे. आंदोलनाची तयारी सुरू असून, पक्षादेश येताच नियोजन करण्यात येणार आहे.
तर भाजयुमोचे शहराध्यक्ष राजगौरव वानखेडे यांनी सांगितले, पक्ष मराठा आरक्षणाच्या बाजूने सुरुवातीपासून आहे. आरक्षण मिळण्यासाठी पक्ष पूर्ण ताकदीने रस्त्यावर येणार आहे.
पक्ष सांगेल तसे आंदोलन होईल
माजी नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी सांगितले, पक्ष सांगेल तसे आंदोलन करण्यात येईल. मराठा आरक्षणासाठी जे समोर येत आहेत, त्यांच्यासोबत भाजप आहे. पक्ष आगामी काळात मराठा समाजासाठी आंदोलन करणार आहे.