मुजीब देवणीकर , औरंगाबाद दख्खनच्या पठारावर अनेक खडकाळ डोंगरांच्या मधोमध अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेलं गाव म्हणजे औरंगाबाद. कधी काळी हे शहर टांग्यांचे म्हणून ओळखले जायचे. आज ते जगभर मर्सिडीजचे शहर म्हणून ओळखले जात असले तरी लोकसंख्येचा मोठा प्रश्न शहरासमोर उभा आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या साठ वर्षांत तब्बल तिप्पट लोकसंख्या वाढली आहे. १९५१ मध्ये ती केवळ ११ लाख ७९ हजार ४०४ इतकी होती. २०११ मध्ये ती ३६ लाख ९५ हजार ९२८ इतकी झाली. याच गतीने लोकसंख्या वढत राहिली तर जिल्ह्यात एक चौरस किलोमीटरमध्ये ४६३ लोकांना राहावे लागेल. डॉ. रफिक झकेरिया यांनी शहराचे आमदार असताना राज्य मंत्रिमंडळात विविध खाती सांभाळली. त्यांच्याच पुढाकाराने शहरात सिडकोची वसाहत आली. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत एपीआय व इतर छोट्या-मोठ्या कंपन्या बऱ्यापैकी वाटचाल करीत असताना अनेक नवीन उद्योग सुरू झाले. ८० ते ९० च्या दशकात व्हिडिओकॉन, बजाज, झालानी, फोर्बस, लोम्बार्दिनी आदी कंपन्यांनी खेड्यापाड्यांतून आलेल्या लोकांचा संसार थाटायला हातभार लावला. चिकलठाण्याबरोबरच रेल्वेस्टेशन भागातील एमआयडीसीही गजबजली. पैठण आणि वाळूजला औद्योगिक वसाहती झाल्या. आता शेंद्रा औद्योगिक वसाहत स्कोडाच्या पावलांनी भरभराटीस येत आहे. भौगोलिकदृष्ट्या शहर चारही दिशांनी वाढत गेले. पूर्वेकडे सिडको, ब्रिजवाडी, नवीन मोंढा, मयूरपार्क आदी अनेक वसाहती उभ्या राहिल्या. पश्चिमेकडे पडेगाव ते वाळूजपर्यंत शहर वाढत गेले, तर दक्षिणेकडे डोंगर असल्याने आरेफ कॉलनी, हिलाल कॉलनी अशा अनेक नवीन वसाहती तयार झाल्या. उत्तरेकडे सातारा, देवळाई परिसरात अनेक वसाहती उभ्या राहिल्या. शहर विस्तारले, तशी लोकसंख्याही वाढली. सोबत समस्यांचा डोंगरही वाढला. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची निव्वळ महापालिका क्षेत्रातली लोकसंख्या ११ लाख ७१ हजार २६० आहे. २००१ मध्ये हीच संख्या ८ लाख ७३ हजार ३११ इतकी होती. याचाच अर्थ दहा वर्षांमध्ये जवळपास तीन लाखांची भर पडली आहे.जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८ आहे. दहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात एक चौरस किलोमीटर क्षेत्रात २८६ लोक राहत होते. आता तेवढ्याच क्षेत्रात ३६५ लोक राहतात. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १० हजार १३८ चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे येणाऱ्या दहा वर्षांत एक चौरस किलोमीटरमध्ये ४६३ लोकांना राहावे लागेल. राज्यात औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावरमागील दहा वर्षांमध्ये लोकसंख्या वाढीचे प्रमाण बघितल्यास राज्यात औरंगाबाद जिल्ह्याचा क्रमांक तिसरा आहे. ४ठाण्याची सर्वाधिक ३५.९४ टक्के वाढ झाली आहे. पुणे (३०.३४), औरंगाबाद (२७.३३), नंदुरबार (२५.५०), नाशिक (२२.३३), जालना (२१.८४) आणि परभणी (२०.१८), अशी जिल्हावार लोकसंख्यावाढ आहे. साक्षरतेत २२ वा!साक्षरतेच्या बाबतीत औरंगाबाद जिल्हा २२ व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी २५ लाख ५६ हजार नागरिक साक्षर आहेत. २००१ मध्ये जिल्हा २४ व्या क्रमांकावर होता. तेव्हा पुरुष व महिला साक्षरतेच्या प्रमाणामध्ये २४.८२ टक्क्यांचा फरक होता. २०११ मध्ये १८.५० टक्क्यांचा फरक राहिला आहे.महिलांचे प्रमाण ९१७जिल्ह्यात एक हजार पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण ९१७ आहे, तर २००१ मध्ये ९२५ इतके होते. गेल्या दहा वर्षांत त्यात आठने घट झाली आहे. पुरुष व महिलांच्या प्रमाणानुसार जिल्हा राज्यात ३१ व्या क्रमांकावर आहे.
जागा तेवढीच, लोकसंख्या तिप्पट !
By admin | Updated: July 11, 2014 01:04 IST