जालना : येथील नगर पालिकेचे कर्मचारी तब्बल दोन महिन्यांपासून वेतनाविना असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासत आहे.नगर पालिका कर्मचाऱ्यांना बीडीएस प्रणाली अंतर्गत वेतन अदा करण्यात येते. यात एप्रिल ते डिसेंबर असा ग्रँट येण्याचा टप्पा असतो. परंतु यंदा हे ग्रँट नोव्हेेंबरपर्यंतच मिळाले. त्यामुळे नोव्हेंबर व डिसेंबरचे वेतन झाले नाही. जालना पालिकेत विविध विभाग, शाळा मिळून ८०० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी दोन कोटींचे वेतन अदा केले जाते. दोन महिन्यांपासून वेतन रखडल्याने सर्वच कर्मचारी हातबल झाले आहेत. विशेषत: शिक्षकांना वारंवार या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी ८० टक्के वेतन शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून तर २० टक्के शासनाकडून प्राप्त होते. यानुसार शिक्षकांना वेतन अदा केले जाते. याविषयी मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे म्हणाले की, पालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे वेतन दोन महिन्यांपासून झालेले नाही. बीडीएस प्रणालीअंतर्गत तांत्रिक बाब पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन दिवसांत धनादेश मिळणार आहे.त्यानंतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल. केवळ तांत्रिक बाबीमुळे वेतनास विलंब झाल्याचे मनोहर यांनी स्पष्ट केले.
तांत्रिक बाबीत अडकले वेतन
By admin | Updated: January 16, 2015 01:06 IST