परतूर : परतूर तालुक्यात चार- पाच दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून एकाच दिवसात ९३ मि. मी. पाऊस झाला. अतिवृष्टीने नदीनाल्यांना पूर आला. शेतात पाणी भरले आहे. तर दुधना नदी दुथडी भरून वाहत असल्याने निम्न दुधना सिंचन प्रकल्पात ५३ टक्के पाणी साठा झाला आहे.परतूर तालुक्यात आठवडाभरापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणीच झाले आहे. नदया, नाल्यांना पुर येऊन शेतात पाणी भरले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची पिक पाण्याखाली गेली आहेत. तालुक्यात सर्वदूर हेच चित्र असून, यामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे. विशेषत: हा पाऊस जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यासाठी पोषक ठरला आहे. तर काही ठिकाणी अति पावसाने पिके धोक्यात आली आहेत. शेतातील बांधबंदीस्ती फुटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरासह ग्रामिण भागातील रस्ते उखडले आहेत. परतूर सर्कलमध्ये ३१ आॅगस्ट रोजी सर्वाधिक १२० मि. मी. ची नोंद झाली. तर आष्टी ९८ मि. मी. सातोना १०८ मि. मी., श्रीष्टी ९० मि.मी., वाटूर ४८ मि.मी. मिळून एका दिवसात सरासरी ९२.८० टक्के पावसाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्याची सरासरी पासाची नोंद ३९१. ८० मि. मी. झाली आहे. पारडगाव: घनसावंगी तालुक्यातील पारडगाव परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. रविवारीही या भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ओढ्या नाल्यांना मोठा पूर आला. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक ठरला आहे. तर काही ठिकाणी अतिपावसाने पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.या पावसाने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, येथील आठवडी बाजारात ठिक ठिकाणी पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. (वार्ताहर) मंठा: तालुक्यात दोन दिवसांपासून दमदार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांची परिस्थितीही नाजूक होती. दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे पिकांना पुन्हा जीवदान मिळाले आहे. पावसामुळे बाजारपेठेतही चैतन्य आले आहे. सणा- सुदीत पाऊस पडल्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण असल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. मंठा शहरासह तळणी, उस्वद, जयपूर, पांगरी गोसावी आदी भागात चांगला पाऊस झाला. कापूस, सोयाबीन पिके जोमात आहेत.नेर: जालना तालुक्यातील नेर परिसरातही या आठवड्यात चांगला पाऊस झाला. नदी, नाले, विहिरी, शेततळे पाण्याने तुडूंब भरले आहेत. या पावसामुळे परिसरातील पाणीटंचाईही काहीअंशी निकाली निघाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटला आहे. कापूस, सोयाबीन, मका तसेच भाजीपाल्यास पावसामुळे फायदा झाला आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (वार्ताहर)
पावसाने परतूर तालुका ओलाचिंंब
By admin | Updated: September 2, 2014 01:50 IST