औरंगाबाद : विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाकडून निर्णय घेतला जात नसल्याच्या विरोधात महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील आणि उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. निदर्शनाबरोबरच सर्व कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष डी. एम. देशपांडे, देवीदास जरारे, भाऊसाहेब पठाण आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार पदाला राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा द्यावा, महसूल विभागातील लिपिकाचे पदनाम बदलून त्याला महसूल सहायक असे पदनाम द्यावे, नायब तहसीलदारांची सर्व पदे पदोन्नतीने भरावीत, राज्यातील सर्व कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा देण्यात यावा, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती लागू करावी, अनुकंपा तत्त्वावरील सेवाभरतीची ५ टक्क्यांची अट रद्द करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत महसूल कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बी. डी. म्हस्के, वसुधा बागूल, मंगला मोरे, अरविंद धोंगडे, महेंद्र गिरमे, मुकुंद गिरी, रेवणनाथ ताठे, परेश खोसरे, श्रद्धा दोडके, बालाजी पालेकर, राहुल बनसोड, सुजाता हातमाळी, सचिन वाघमारे आदी सहभागी झाले.९ जुलै रोजी धरणेसंघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा दीर्घ कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ९ जुलै रोजी धरणे, १४ जुलै रोजी लेखणी बंद आणि १ आॅगस्टपासून बेमुदत संप करण्यात येणार आहे.
महसूल कर्मचाऱ्यांनी केली जोरदार निदर्शने
By admin | Updated: July 2, 2014 01:02 IST