जालना : जालना शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. भर दिवसा घरफोडी, लुटमारीचे प्रकार वाढले आहे. लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांचीही धास्ती चोरटे बाळगत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा व शहरात अजूनही मोठ्या प्रमाणात चंदन तस्करी, गांजा विक्री तसेच सट्टा व हवालामार्गे पैसे पाठविण्याला उधाण आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेले अधिकारी व कर्मचारी यांचे काही गुन्हेगार आरोपींशी ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याची जाणीव होत आहे. शहरात भर दिवसा घर फोडीचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांचा वचक नसल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषत: पोलिस चौकी अथवा उच्चभू्र वसाहतील चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिस अधीक्षकांनी छापा मारण्यासाठी तयारी सुरू केल्यानंतर लगेच संबंधिताला ‘टिप’ दिली जात असल्याची चर्चा आहे. त्याचे महत्वाचे कारण असे की, काही आरोपी अनेक गुन्ह्यात अडकलेले आहेत. ते अजूनही मोकाट फिरत असून त्यांच्यावर छापा मारण्यासाठी केलेली तयारी पूर्णत: अयशस्वी ठरली आहे. मात्र आरोपी लोकांच्या दृष्टीला कायम पडत आहेत. केवळ पोलिसांचा छापा टाकण्याच्यावेळी गायब दिसून येत आहेत. पोलिस दलातील घट्ट मैत्रीच त्याला करणीभूत ठरत असल्याचा दावा पोलिस दलातील ‘इमानदार’ अधिकारी व कर्मचार्यांचा आहे. हुजरेगिरी करून उखळ पांढरे करून घेण्याचा फंडा पोलिस दलात वाढीस लागत आहे. त्यामुळे काही गुन्हेगारांना जाणीवपूर्वक चांगली वागणूक दिली जात आहे. छापे मारण्यापूर्वी पूर्व कल्पना दिली जात असल्याचे माहितगार सूत्रांनी सांगितले. त्यासाठी छापा मारण्यापूर्वी पोलिस अधीक्षकांनी संपूर्ण माहिती गोळा करून पथकाला सज्ज राहण्यास सांगावे. कोठे जायचे आहे, हे अगदी वेळेवर सांगतांना छापा पथकातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याची गरज आहे. छापा मारण्याची बातमी त्यामुळे ‘लिक’ होणार नाही. आरोपींना ‘टीप’ देणार्यांवरही कडक कारवाई होण्याची गरज आहे. गुप्तता बागळून छापे मारले तरच गुन्हेगारीवर वचक बसविता येणे शक्य आहे, असा दावा जाणकार पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शहरातील प्रमुख चौक व बसस्थानकांत लुटमारीचे प्रकार वाढले आहे. शहरातील भोकरदन नाका परिसरात काही दिवसांपूर्वी मध्यरात्री बसमधून उतरलेल्या प्रवशास बेदम मारहाण करुन त्याच्याकडील रोख रक्कम लांबविण्यात आली. विशेष म्हणजे पोलिस चौकीसमोर ही घटना घडली. रात्रीच्या वेळी येथील पोलिस चौकी बंद होती. गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिसांकडून थातूरमातूर उत्तरे दिली जात आहेत. एकूणच पोलिसांची जनतेचा मित्र म्हणून ओळख असली तरी वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
शहरात चोर्यांचे सत्र पुन्हा सुरू
By admin | Updated: May 17, 2014 00:20 IST