हिंगोली : हिंगोली जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प करताना सर्वच लोकप्रतिनिधींनी पक्षाचे जोडे काढून एकसंघपणे काम करण्याची ग्वाही पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात दिली. तर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनीही नवनिर्वाचितांना विकासाच्या टिप्स दिल्या.या कार्यक्रमास गुजराथी यांच्यासह खा.राजीव सातव, आ.तानाजी मुटकुळे, आ.संतोष टारफे, आ.रामराव वडकुते, जिल्हाधिकारी राम गगराणी, मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे, नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ, यास्मिनबेगम, भगवान कुदाळे, पं.स.सभापती महानंदा लोणे, सीताबाई राठोड, जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख, शिवाजी मस्के आदींची उपस्थिती होती.प्रारंभी सभागृहात उपस्थितांनी जिल्ह्यातील क्रीडा, उद्योग, सिंचन, शिक्षण, दळणवळण आदी क्षेत्राशी संबंधित प्रश्न मांडले. प्रास्ताविक नंदकिशोर तोष्णीवाल यांनी केले. त्यानंतर बोलताना नगराध्यक्षा सूर्यतळ म्हणाल्या, शहरातील रस्ते व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. तर आ.टारफे म्हणाले, पक्षभेद विसरून आम्ही जिल्हा विकासासाठी एकत्र येऊ. रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आ.मुटकुळे म्हणाले, सिंचनाचा प्रश्न हा प्राधान्याचा विषय आहे. येत्या वर्षभरात तो मार्गी लावण्याचा प्रयत्न राहिल. पक्षभेद विसरून त्यासाठी काम करावे लागणार आहे. याशिवाय हिंगोली शहराच्या विकासासाठी पालिकेने पुढाकार घेतल्यास मदतीसाठी तयार आह, असेही मुटकुळे यांनी सांगितले.त्यानंतर आ.वडकुते यांनीही सिंचनाच्याच मुद्याला हात घातला. तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. खा.राजीव सातव यांनी चांगली माणसे राजकारणात आली पाहिजे, टिकली पाहिजे, असे सांगितले. तर मागील निवडणुकीत ‘गांधी’ची चलती असल्याच्या अनुभवावर चिंता व्यक्त केली. कन्हेरगाव-नांदेड रस्त्याचे काम एका वर्षानंतर सुरू होईल. सध्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यासाठी दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याशी तीनदा भेटल्याचेही ते म्हणाले. रेल्वे, पोस्ट, दूरसंचार या प्रश्नांबाबत त्यांनी घेतलेल्या पाठपुराव्यामुळे आगामी वर्ष, दोन वर्षांत ही कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर बँकांचे जाळे, लघुउद्योग, अद्ययावत क्रीडासंकुलांसाठी पुढाकार घेण्याची ग्वाही दिली.यावेळी जिल्हाधिकारी गगराणी व मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन वसंतकुमार भट्ट यांनी केले.
विकासाचा संकल्प-२0१५
By admin | Updated: November 15, 2014 23:54 IST