पांडुरंग खराबे , मंठापरतूर मंठा विधानसभा मतदार संघात प्रचारासाठी प्रसार माध्यमांबरोबरच सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. उमेदवार वेगवेगळे स्लोगन टाकून मतदारावर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न करीत आहेत. विरोधी पक्षाकडून त्याला जोरदार प्रतिउत्तर मिळत असल्याने दररोज गमती जमती होत आहेत. सोशल मिडीयाचा वापर सर्वच उमेदवार प्रभावीपणे करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रा.राजेश सरकटे यांनी ‘चेहरा नवा आहे, बदल हवा’ असे घोषवाक्य सोशल मिडीयावर टाकले तर त्याला विरोधी पक्षाचे विनोदी कार्यकर्त्यांनी तात्काळ प्रत्यूत्तर दिले. ते ‘चेहरा नवा आहे, बदल हवा आहे, परंतु, वाटप केव्हा आहे, तवा गरम आहे’ अशी टिप्पणी केली. काँग्रेसचे उमेदवार सुरेशकुमार जेथलिया या निवडणुकीत विकास कामाच्या मापाची घोषवाक्ये सोशल मिडीयावर टाकली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विकासपर्ण पुस्तकाच्या प्रकाशनाची छायाचित्रेही अपलोड केली. यावर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘बस झाल्या विकासाच्या गप्पा, आता फक्त साखरे अप्पा’ असे प्रत्युत्तर दिले. भाजपाचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर ‘दमदार आमदार म्हणून घोष वाक्य टाकले तर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही कोणाच्याही हातात महाराष्ट्र देणार का ? मराठी माणसांनी करायच काय ? असे घोषवाक्य टाकले. तर शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ साखरे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘निश्चय पक्का, आता साखरे अप्पा’ हे घोषवाक्य अपलोड केले. तर मनसेचे उमेदवार बाबासाहेब आकात कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळी झाला घात, आता फक्त आकात’ हे वाक्य टाकले. एकूण मतदार, कार्यकर्त्यांना जोरदार व चविष्ठ चर्चा ऐकावयास मिळत आहे. अनेक सोशल मीडिया वरून आक्षेपार्ह फोटो मजकूर, टाकून निवडणूक विभागाची कार्यवाही होऊ शकते असा दम देऊनही विविध राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांचे फोटो, घोषवाक्य वर्तमान पत्रातील आलेल्या बातम्यांचे कात्रण सोशल मीडियावर टाकून देतात. ४यात आणखी विशेष बाब म्हणजे रोजच्या या सोशल मीडियावर टाकण्यात येणाऱ्या मजकूराला आता काही लोक चांगलेच वैतागले असल्याचे बोलले जात आहे.
उत्तर-प्रत्युत्तराने गरमा-गरमी
By admin | Updated: October 2, 2014 00:35 IST