गंगाखेड: काळ्या बाजारात जाणारा १८३ पोते गहू २६ नोव्हेंबर रोजी गंगाखेड पोलिसांनी पकडला होता. या प्रकरणात अटक केलेल्या वाहन चालकाची २७ नोव्हेंबर रोजी जामिनावर मुक्तता करण्यात आली.सार्वजनिक वितरण प्रणालीतील एम. एच. २४-एफ ७३१५ या ट्रकमधून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात होता. २६ नोव्हेंबर रोजी गंगाखेड पोलिसांनी शहरातील परभणी रस्त्यावर हा गहू पकडला. चालक ज्ञानोबा श्रीधर फड (रा. खादगाव) याने हा गहू धारासूर, महातपुरी येथे नेत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. परंतु, चालकाकडे या गव्हाचा परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी ज्ञानोबा फड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. १८३ पोते गहू पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणात २७ नोव्हेंबर रोजी चालक ज्ञानोबा फड यांनी न्यायालयाकडे जामीन अर्ज मिळविण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने फड यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणात नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. गंगाखेड तालुक्यातून १८३ पोते गहू पकडण्यात आला. त्यामुळे स्वस्तधान्याची मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्री होत असल्याच्या प्रकाराला पुष्ठी मिळत आहेत. ४दारिद्र्य रेषेखालील आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना माफक दरात धान्य पुरवठा केला जातो. गोरगरीब नागरिकांसाठी येणारे हे धान्य अनेक वेळा त्यांना मिळतही नाही. या धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. स्वस्तधान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार होतात. परंतु, या तक्रारींची गांभिर्याने दखल घेतली जात नाही. तात्पुरती कारवाई केली जाते. जिल्हा पुरवठा विभागाकडून अशा प्रकारांकडे डोळेझाक केली जात असल्याने सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात जात आहे. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून कठोर कारवाईची आवश्यकता आहे.
आरोपीची जामिनावर मुक्तता
By admin | Updated: November 28, 2014 01:13 IST