औरंगाबाद : बनावट कागदपत्रांच्या आधारे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चे सीमकार्ड वापरणाऱ्या लोकांचा दहशतवादविरोधी पथक (एटीएस) शोध घेत आहे. या पथकाने कन्नड तालुक्यातील एका शेतकऱ्याचे सीमकार्ड परस्पर वापरणाऱ्या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी त्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी फेटाळून लावला.डॉ. इकबाल मिन्ने असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी बीएसएनएलचा निवृत्त कर्मचारी रमेश दिवटे यास अटक केली होती. त्यानंतर त्यास मदत करणारा शेख अब्दुल शेख नईम या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यास न्यायालयात नेत असताना तो पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्यास सुरुवात केली. तेव्हा गायकवाड यांच्या नावे असलेले सीमकार्ड डॉॅ. इकबाल मिन्ने हे वापरत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात आपल्याला अटक होऊ शकते, या भीतीपोटी त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या अर्जात त्यांनी म्हटले की, दिवटे हे माझे मित्र होते व त्यांनी आपले कार्ड म्हणून मला वापरण्यास दिले होते. डॉ. मिन्ने हे सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि प्रतिष्ठित डॉक्टर आहेत. आपण काहीही गुन्हा केलेला नाही. अर्ज सुनावणीसाठी न्यायालयासमोर आला असता सरकार पक्षातर्फे अॅड. नवले यांनी त्यांना जामीन देण्यावर आक्षेप घेतला. शेतकऱ्यासाठी असलेल्या शासकीय योजनेचे सीमकार्ड गैरमार्गाने घेण्यात आले आहे. तसेच त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती त्यांनी केली. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिले.
सीमकार्डप्रकरणी डॉक्टरचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By admin | Updated: October 6, 2014 00:42 IST