लातूर : औसा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करून आल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी लातुरातील विश्रामगृह येथे शिवसेना नेते रामदास कदम यांना रक्ताच्या स्वाक्षरीसह दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यामुळे शिवसेना नेते हादरुन गेले. लातूर जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. चारा-पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. खरीप हंगाम हातचा गेला असून, रबीच्या पेरण्याही नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. अनेक गावांत पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांना चारा नाही, त्यामुळे कवडीमोल किंमतीत पशुधन शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. तरीही अद्याप शासनाकडून दुष्काळी उपाययोजना होत नाहीत. त्या तात्काळ कराव्यात, यासाठी शासनाला भाग पाडावे, अशा आशयाचे निवेदन रक्ताच्या स्वाक्षरीसह शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते आ. रामदास कदम, दिवाकर रावते, आ. विजय शिवदामे, आ. कृष्णा घोडा, आ. ज्ञानेश्वर चौगुले, आ. शांताराम मोरे, आ.डॉ. बालाजी किनीकर आदींच्या उपस्थितीत लातूर येथे देण्यात आले. सह्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन पाहून उपस्थित शिवसेना नेते हादरून गेले. शासन दुष्काळ जाहीर करीत नाही व उपाययोजना करीत नाही, तोपर्यंत शिवसेना मंत्र्यांना फिरू देणार नाही, असे आश्वासन निवेदनकर्त्यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावेळी दिले.(प्रतिनिधी)रक्ताच्या स्वाक्षरीच्या निवेदनावर दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही रक्तानेच लिहिलेली होती. दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजना तात्काळ सुरू कराव्यात, अशीही मागणी यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेना नेत्यांकडे केली.
रक्ताच्या सह्यांचे निवेदन
By admin | Updated: November 25, 2014 00:57 IST