उस्मानाबाद : जिल्ह्याच्या विविध भागात सलग तिसर्या दिवशीही वादळी वार्यासह पाऊस झाला. कळंब तालुक्यात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून विद्युत खांबही आडवे झाले आहेत. तसेच लोहारा तालुक्यात दोन ठिकाणी विजा पडून एकजण ठार तर एक जखमी झाले. झाडे उन्मळून पडली कळंब : शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास बोर्डा गाव व परिसरात वादळी वार्यासह पाऊस झाला. वादळी वार्यामुळे पोपट शेळके, संदीपान शेळके, परमेश्वर शेळके, रामेश्वर शेळके आदींच्या शेतातील गोठे जमीनदोस्त झाले. त्याचप्रमाणे संदीपान शेळके यांच्या पत्र्याचे शेडही उडून गेले आहे. वार्यामुळे अनेकांच्या कडब्यांच्या गंजी उडून गेल्या. तसेच बाळासाहेब करडे, हरिभाऊ सौदागर, नामदेव सौदागर, शाहु कांबळे यांच्यासह आदींच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. बोर्डा शिवारातील कुंभारवाडी रस्ता, आंदोरा रस्ता या भागातील असंख्य झाडे उन्मळून पडली. याशिवाय वीज वाहक तारा तुटल्या आहेत. तसेच विद्युत खांबही कोसळल्याची माहिती बाजार समितीचे संचालक प्रणव चव्हाण यांनी दिली. दरम्यान, सुहास शेळके यांच्या शेतात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी वादळी वार्यामुळे अचानक झाडाचा फाटा अंगावर पडल्याने ते ह्यात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कळंब येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. ४५ मिनिटे पाऊस उमरगा : शहरासह परिसरात शुक्रवारी वादळी वार्यासह पाऊस झाला. सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत सूर्यदर्शनही झाले नाही. असे असतानाच दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. वादळी वार्यामुळे तुरोरी, तलमोड, दापका, चिंचोली (ज), डिग्गी, बेडगा या गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत. जवळपास ४५ मिनीटे झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शेतातील ताली फुटल्या येरमाळा : कळंब तालुक्यातील वडगाव जहांगीर, शेलगाव (दिवाने), चोराखळी, नाथवाडी, येरमाळा परिसरात शुक्रवारी दुपारी साडेचार ते सायंकाळी पाच या वेळेत वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने काही ठिकाणी शेतातून पाणी बाहेर पडले. तर काही ठिकाणी शेतातील तालीही फुटल्या. राष्टÑीय महामार्ग क्र. २११ वरील नाथवाडीनजीक अनेक लहान-मोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली होती. शिवाय नाथवाडी परिसरातील एका हॉटेलसमोर एका वाहनावर झाड कोसळून पडले. त्यामुळे वाहनाचे मोठे नुसाकन झाले. तसेच कळंब-येरमाळा रोडवर तेरणा नदीच्या अलिकडे बाभळीचे मोठे झाड उन्मळून पडले. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. (वार्ताहर) गवंडी कामगार जखमी लोहारा : तालुक्यातील धानुरी शिवारात वीज पडून ४५ वर्षीय गवंडी कामगार गंभीररित्या जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. धानुरी येथील गवंडी कामगार तुकाराम शंभु वडजे (वय ४५) हे करजगाव येथून धानुरीकडे निघाले होते. ते धानुरी शिवारात आले असता, वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली थांबले असता, अचानक वीज पडली. यामध्ये तुकाराम वडजे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
वादळी वार्यासह तिसर्या दिवशीही पाऊस
By admin | Updated: May 31, 2014 00:33 IST