कळंब / भूम : कळंब व भूम तालुका परिसरात शनिवारी दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली़ वाशी तालुक्यातही तुरळक पाऊस झाला़ या पावसात वीज पडल्याने एका युवकासह जनावरेही ठार झाली़ माघ नक्षत्रात जवळपास महिनाभराच्या कालखंडानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे़ जिल्ह्यात गुरूवारी दमदार पाऊस झाला होता़ त्यानंतर शनिवारीही पावसाने चांगली हजेरी लावली़ या पावसामुळे कळंब तालुक्यातील ७८ हजार हेक्टरवरील खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे़ मात्र, पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडल्याने साठवण तलावातील पाणीपातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही़ कळंब महसूल मंडळामध्ये चांगला पाऊस झाला आहे़ तर सर्वात कमी पाऊस असलेल्या ईटकूर मंडळात ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ भूम तालुका व परिसरातही शनिवारच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती़ या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे़ (वार्ताहर) इटकूर येथील विशाल उर्फ राम बापू घाटुळे (वय-१८) हा युवक शनिवारी शेतात गेला होता़ दुपारी अचानक वीजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने विशाल व शेतात कामासाठी आलेला बाबू नागू मोटे हे दोघे आडोशाला झाडाखाली जात असताना वीज पडली़ या त विशाल घाटुळे याचा मृत्यू झाला तर बाबू मोटे हा जखमी झाला आहे़ भूम शहरातील सचिन पांडुरंग भोळे, तानाजी रामलिंग शेंडगे यांच्या दोन गाई शनिवारी दुपारी मस्कर वस्तीवरील शेतात झाडाखाली बांधल्या होत्या़ पावसात वीज पडल्याने दोन्ही गाई ठार झाल्या असून, शेतकऱ्यांचे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले असून, तलाठी वाय़यू़हाके यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला़ तर कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शेतकरी संभाजी भिमराव हिलकुरे यांनी शेतातील गोठ्यासमोर गाय बांधली होती़ गाईजवळ वीज पडल्याने विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला़
कळंबसह भूम परिसरात पाऊस
By admin | Updated: August 24, 2014 00:17 IST