ंहिंगोली : आखाडा बाळापूर येथील विविध विकासकामांच्या अनियमिततेबाबत जि. प. च्या स्थायी समितीत झालेल्या बैठकीत आज सरपंच व उपसरपंचावर कलम ३९ (१) अंतर्गत बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीस जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे, उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, सभापती राजाभाऊ मुसळे, रंगराव कदम, मधुकर कुरुडे, निलावती सवंडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांची उपस्थिती होती. बैठकीत बोलताना अध्यक्षा बोंढारे यांनी सुरुवातीलाच या प्रकरणात अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे सांगून योग्य तो प्रस्ताव सादर करा, असे सांगितले. त्यानंतर अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. त्यात संपूर्ण स्वच्छता अभियानात बाळापूर येथे २0१0-११ या वर्षात मंजूर शौचालयाच्या युनिटचे प्रत्येकी १ लाख ७५ हजार रुपयाप्रमाणे १२ लाख ६0 हजार ग्रा. पं. ला दिले होते. त्यात ३ युनिटचे मूल्यांकन ५.0४ लाख झाले. तर ४.२७ लाख शिल्लक असल्याचे म्हटले. उर्वरित तीनपैकी एकच काम पूर्ण असून दोन सुरू आहेत, असे अहवालात म्हटले. कचराकुंडी खरेदीबाबत मिळालेले ९५ हजार ४0 कुंड्या खरेदीसाठी वापरले. मात्र प्रत्यक्षात ९ कुंड्या तपासणीत आढळल्या. त्याचा पंचनामा सादर करण्यात आला. तर आवश्यकता नसताना ७ बाजार ओट्यांचे बांधकाम पाडण्यात आले. त्यात ज्या व्यापाऱ्यांचे गाळे ओट्याला लागून आहेत. त्यांच्यांवर संशयित म्हणून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास गटविकास अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. ग्रा. पं. ज्या जागा ठरावाशिवाय करारनामे करून भाडेचिठ्ठीने दिल्या ते सर्व करारनामे रद्द करण्याचे पत्रही गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर सरपंच मारोती शंकरराव खरोडे व उपसरपंच म. इसाक कुरेशी यांनी पदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत अधिनियमचे कलम ३९ (१) नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव जि. प. कडे गटविकास अधिकाऱ्यांनी सादर केला. तो जि. प. ने आयुक्तांकडे पाठविला असल्याचे सांगण्यात आले.यावर जि. प. सदस्य गजानन देशमुख यांनी अनियमितता सिद्ध करण्यासाठी अधिकाऱ्यांची चौकशी समिती वा स्थायीची समिती नेमून ही कारवाई करायला हवी होती. गटविकास अधिकाऱ्यांनी थेट अहवाल कसा काय सादर केला. त्याला काय आधार आहे. ही बाब आम्हाला मान्य नसल्याचा मुद्दा मांडला. (जिल्हा प्रतिनिधी)
सरपंचावर बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव
By admin | Updated: September 13, 2014 00:10 IST