भास्कर लांडे, हिंगोलीध्यानी, मनी आणि स्वप्नी नसलेली हवाई सफर ‘लोकमत’ ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमामुळे मिळाल्याने आनंदाला परिसीमाच राहिली नव्हती. त्यापूर्वी पाहुण्यांच्या घरी असताना हवाई सफरची वार्ता कळल्यापासून ते विमानात बसेपर्यंत सर्वजण मला ‘तू लकी’ आहेस, असे सांगत होते; परंतु जेव्हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तेच वाक्य उच्चारले, तेव्हा माझा आत्मविश्वास द्विगुणीत झाला. आणि मी खरच लक्की असल्याचे वाटू लागले, हे सगळे स्वप्नासारखे घडत गेले. त्याचे पूर्णत: श्रेय ‘लोकमत’ला जाते, अशी भावना अभिषेक संजय मेथेकर याने मुलाखतीत व्यक्त केली. ‘लोकमत’ संस्काराचे मोती निसर्ग सफारी २०१३ अंतर्गत मंबई ते दिल्ली हवाई सफरसाठी हिंगोली जिल्ह्यातून अभिषेक संजय मेथेकर याची निवड झाली होती. चार दिवसांपूर्वी ही सफर अनुभवलेल्या अभिषेकने शनिवारी ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या. आई-वडिलांसमवेत तो म्हणाला पहिल्या वर्गापासून ‘लोकमत’च्या विविध उपक्रमांत सहभागी होत आलो आहे. सामान्यज्ञान, मुलांसाठी संस्कार, परिपाठ आदी उपक्रमांमुळे ‘लोकमत’ वृत्तपत्र आवडीने आजही वाचतो. त्यामुळे गतवर्षी ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमात सहभागी होताना कधीही परितोषिकाचा हव्यास नव्हता. तसा हेतूही मनाला शिवला नाही. प्रतिवर्षीप्रमाणे गतवर्षी कुपन्स जमा करून चिटकवित गेलो. इतर मुलांप्रमाणे कुपन्सची सीटही शाळेतील बॉक्समध्ये टाकली. मध्यंतरी सुटी आल्याने मी मावशीच्या गावी गेलो होतो. तितक्यात मावशीच्या मोबाईलवर पप्पाचा (संजय मेथेकर) कॉल आला. समोरून विमानाच्या ‘हवाई सफर’साठी जिल्ह्यातून निवड झाल्याचे सांगत उद्याच हिंगोलीत येण्याचे पप्पानीं सांगितले. मला सुरूवातीला विश्वासच बसला नाही. कारण घरी येण्यासाठी पप्पा खोट बोलत असल्याचे वाटले; पण निवड झाल्याचे मम्मीने सांगितल्यावर आनंदला उधाण आले. मी एकच जल्लोष केला. सर्वजन माझ्याकडे पाहू लागले आणि प्रत्येकजण मला ‘तू लक्की’ असल्याचे सांगू लागले; परंतु मला त्यांचे बोलणे फिजूल वाटू लागले. तद्नंतर घरी, दारी, शेजारी सर्वजण मला भाग्यवान असल्याचे सांगू लागले. दरम्यानच्या कालावधीनंतर हवाई सफरची वेळ जवळ येवू लागल्याने मनात तरंग उठत गेले. शेवटी तो १० जुलैचा दिवस उजाडला. हिंगोलीतून औरंगाबाद आणि औरंगाबादेतून मुंबई गाठली. मुंबईत नवीन समवयस्क मित्र मिळाले. थोड्याच वेळेने विमानाच्या पायऱ्या चढताना पायऱ्याऐवजी मी विमानाच्या आत डोकावू लागलो. तितक्यात विमानात शिरल्यावर मला कशाचीही आठवण झाली नाही. अत्याधिक आनंदात असतानाच योगायोगाने ऐन खिडकी शेजारी सीट मिळाली. आनंदाच्या भरात सीट बेल्ट बांधल्यानंतर लगेचच विमान उड्डाण घेतले आणि हा माझ्या जीवनात अविस्मरणीय क्षण कोरल्या गेला. विमानातील दोन तासात मी मनाशीच बोलत होतो. दिल्ली विमानतळावर विमान उतरल्यानंतर सर्वांसोबत संसद भवन येथे गेलो. नेहमी टीव्हीवर दिसणारी संसद, नेते पाहत होतो. ‘याचि देही याचि डोळा’ संसद पाहिल्यानंतर घरी, दारी, रस्त्यांवर, पाहुूणे मंडळीत आणि टीव्हीवर ज्यांच्याबद्दल चर्चा चालू असते, अशा व्यक्तीमत्वाला भेटण्याचा योग आला. तेंव्हा काहीही सुचत नव्हते. त्या वातावरणात इतरांसोबत मी पंतप्रधानांच्या दालनात शिरलो. आत गेल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी चक्क मराठीत संवाद साधण्यास सुरूवात केली. पहिल्याच वाक्यात त्यांनी ‘तुम्ही लक्की’ आहात, असे सांगितले. सर्वांचेच शब्द मोदी यांनी उच्चारले. तेव्हा खरच मी भाग्यवान असल्याची जाणीव झाली. सुरूवातीला ३ मिनिटे वेळ देणारे पंतप्रधान नरेंद मादी यांनी तब्बल १३ मिनिटे आम्हाला मार्गदर्शन केले. इतक्या कमी वयात थेट पंतप्रधानांकडून मार्गदर्शन मिळाल्याने माझ्यातील आत्मविश्वास डोंगराएवढा झाला. हिंगोलीसारख्या ठिकाणाहून आलो तरी एकदम मोठे झाल्यासारखे वाटू लागले. पुढे इंडीया गेट, लाल किल्ला, राजघाट पाहताना तोच विचार मनात येवू लागला. तो एक दिवस एका तासासारखा निघून गेला. सर्व स्वप्नासरखे वाटू लागत असताना विमानाने मुंबईकडे झेप घेतली. मी स्वत:शी बोलू लागलो. आयुष्यात कधी विमानात बसेन, असे वाटले नसताना बालपणीच ही संधी चालून आली. परिपाठ आणि संस्काराची माहिती घेण्यासाठी विकत घेत असलेल्या ‘लोकमत’मुळे माझ्या आयुष्यात सोनेरी दिवस लिहिल्या गेला. हे अविस्मरणीय क्षण मला अनुभवायला मिळाल्यामुळे ‘लोकमत’चे कोटी, कोटी आभार, अशी भावना हवाई सफर अनुभवलेल्या अभिषेक मेथेकर याने व्यक्त केली. योगायोगाने ऐन खिडकी शेजारी सीट मिळाली. आनंदाच्या भरात सीट बेल्ट बांधल्यानंतर लगेचच विमान उड्डाण घेतले आणि हा माझ्या जीवनात अविस्मरणीय क्षण कोरल्या गेला. विमानातील दोन तासांत मी मनाशीच बोलत होतो.
पंतप्रधान म्हणाले...तू लकी आहेस
By admin | Updated: July 13, 2014 00:29 IST