लातूर : जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हास्तरावर आणि पंचायत समिती स्तरावर संग्राम कक्ष स्थापन करण्यात आला असून, या कक्षात संगणक परिचालक मोठ्या संख्येने आहेत. मात्र त्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने त्यांना कामावरून कमी करण्याचा दम प्रशासनाकडून भरला जात आहे. जिल्हास्तरावर डीसीडीसी आणि तालुकास्तरावर टीसीटीसी संगणक परिचालक आहेत. जिल्हा स्तरावरुन पंचायत समिती स्थारावर आणि पंचायत समिती स्तरावर आॅनलाईन कामकाज व्हावे, म्हणून संग्राम कक्ष स्थापन झाला आहे़ यात अनेकजण संगणक परिचारक म्हणून काम करीत आहेत़ त्यांनी १५ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन चालू केले आहे़ जिल्ह्यातील दहाही पंचायत समितीत असलेल्या संगणक परिचालक संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे़ मात्र गटविकास अधिकाऱ्यांना काम बंदचे निवेदनही देण्यात आले आहे़ १७ डिसेंबर रोजी पंचायत समितीस्तरावर संगणक परिचालक संघटनांनी बैठक घेतली़ मात्र या बैठकीला हजर राहिल्यास तुमच्यावर कारवाई केली जाईल़ तुम्हाला काढून टाकले जाईल़ अशी धमकी प्रशासनाकडून देण्यात आली असल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र ग्रामपंचायत संगणक परिचालक कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे़ संघटनेच्या विरोधात तालुका व जिल्हास्तरावरुन असे दबावतंत्र वापरले जात आहे़ आमच्या मागण्याचा सकारात्मक विचार करण्याऐवजी दबाव व भिती दाखवून आंदोलन मोडीस कढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर सोमवंशी, सचिव विशाल लांडगे, सहसचिव सुमित चापटे, दत्तात्र्ये बनसोडे, शरद घुने, संजयकुमार चाकूरे, दत्ता पाचंगे, रामेश्वर डोनगावे आदींनी म्हटले आहे़ (प्रतिनिधी)
संगणक परिचालकांच्या आंदोलनावर दबाव
By admin | Updated: December 22, 2014 01:01 IST