जालना : जिल्हा परिषदेतअंतर्गत शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती देऊन अगोदर शिक्षकांमधून मुख्याध्यापक पदी पदोन्नती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशासनाकडून पदोन्नतीपूर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेला जिल्ह्यात सुरू असलेल्या आचारसंहितेचा कुठलाही अडसर नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा परिषदेत १९ मे पासून समुपदेशनद्वारे कर्मचार्यांची बदली प्रक्रिया सुरू झाली. संच मान्यतेनुसार अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा शाळेवर जास्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन आणि सर्वसाधारण बदल्या (जिल्हास्तरीय विनंती व आपसी ) २१ मे रोजी निश्चित केलेल्या होत्या. मात्र शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया अगोदर घेण्यासाठी बदली प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रक्रियेस पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे सुरू असलेल्या आचारसंहितेचा अडसर येतो काय, अशी चर्चा शिक्षकांमध्येच सुरू झाली होती. मात्र अद्याप याबाबत शासनाकडून काही सूचना आल्या नाहीत. त्यामुळे पदोन्नतीची पूर्व प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या पदोन्नतीपात्र शिक्षकांची कागदपत्रे तपासून त्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. अद्याप पदोन्नती प्रक्रियेची तारीख निश्चित झालेली नाही. मात्र येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया होईल, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी) इच्छुकांच्या चकरा बदल्यांअगोदर पदोन्नतीची प्रक्रिया घेण्यात येणार असल्याने पदोन्नती पात्र शिक्षकांच्या जिल्हा परिषद कार्यालयात चकरा सुरू झाल्या आहेत. तर आपसात बदल्यांसाठी सहकार्यांच्या शोधात असलेले शिक्षक मात्र फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे अगोदर पदोन्नती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत सर्व जण आहेत.
शिक्षकांच्या पदोन्नतीपूर्व प्रक्रिया
By admin | Updated: May 30, 2014 00:27 IST