बीड: येथील बसस्थानक समस्यांबाबत नेहमीच विविध कारणाने चर्चेत असते. मागील अनेक दिवसांपासून येथील बसस्थानकातील खड्डे बुजविण्यात आलेले नव्हते. मात्र रविवारी बसस्थानकाच्या भूमिपूजनासाठी मंत्र्यांची उपस्थिती लाभणार होती त्यामुळे स्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी महामंडळातील संबंधित विभागाचा अधिकारी उजाडल्यापासूनच तळ ठोकून होता.रविवारी बीड येथील बसस्थानकाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. हे मान्यवर भूमिपूजनासाठी येणार म्हटल्यानंतर येथील विभागीय कार्यालयातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानकातील खड्डे बुजविण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून स्थानकातील खड्डे दिसले नाहीत तेच अधिकारी रविवारी सकाळपासूनच स्थानकात तळ ठोकून होते. मंत्र्यांच्या गाड्यांना आदळा बसू नये म्हणून खड्डे बुजविणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्य प्रवाशांच्या त्रासाची दखल नसल्याचे यावरून स्पष्ट होते. यापूर्वी अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी बसस्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी आंदोलन केले. विभागीय नियंत्रकांना निवेदने दिली. नियंत्रकांनी संबंधित विभागाला खड्डे बुजविण्या संदर्भात पत्रही दिले. मात्र या पत्राला संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली. दोन जिल्ह्यांना जोडणारे मध्यवर्ती बसस्थानक म्हणून या बसस्थानकाची ओळख आहे. मात्र याच बसस्थानकाची स्वच्छता व सुशोभिकरण पाहिले तर कोणालाही या बसस्थानकाबद्दल शंका आल्याशिवाय राहणार नाही. या बसस्थानकात प्रवाशांना कुठल्याच सोयी- सुविधा मिळत नाहीत. पिण्याच्या पाण्यापासून ते बसण्याच्या बाकड्यापर्यंत प्रवाशांचे हाल आहेत. नुसते प्रवाशांचेच हाल नाहीत तर महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाल होतात. (प्रतिनिधी)बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस गुडग्या एवढ्या पडलेल्या खड्डयांमध्ये मुरूम टाकून मलमपट्टी करण्यात आली. मुरूम टाकल्यानंतर ते दाबण्यासाठी रोलरऐवजी चक्क बसचाच वापर करण्यात आला. याकडे मात्र येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होते. मंत्र्यांच्या आगमनामुळे खड्डे बुजले खरे मात्र ते किती काळ टिकतात याबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे.कारण हे खड्डे बुजविण्यासाठी निकृष्ट दर्जाचा मुरूम वापरण्यात आला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे, निलेश उपाध्ये यांनी केला. यापूर्वी स्थानकातील व आगारातील खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात आले होते. यावर कुठलेही डांबरीकरण करण्यात आले नाही. या निकृष्ट कामा बद्दल अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलनही केले होते. मात्र याची कुठलीही दखल महामंडळातील बांधकाम विभागातील अधिकाऱ्याला घ्यावीसी वाटली नव्हती. मात्र रविवारी तोच अधिकारी उजाडल्यापासूनच स्थानकात तळ ठोकून होता. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
अध्यक्षांच्या दौऱ्यामुळे खड्ड्यांची डागडुजी
By admin | Updated: August 25, 2014 23:50 IST