कळंब : तालुक्यातील मग्रारोहयोंतर्गत झालेल्या अडीच कोटीच्या कथित घोटाळ्यामध्ये जिल्हा प्रशासन कोणावर कार्यवाही करते? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या अडीच कोटीच्या घोटाळ्यासोबत इतरही काही घोटाळे बाहेर पडण्याची शक्यता आहे.कळंब तालुक्यामध्ये मग्रारोहयोंतर्गत २०११-१२ मध्ये केलेल्या कामाची काही देयके या देयकांबाबत संशय आल्याने तहसीलदारांनी या कामांची चौकशी केली असता, हा सर्व मामलाच बोगस असल्याचे समोर आले होते. या कामांची देयके ज्या मोजमाप पुस्तिकेवर नोंदविण्यात आली होती ती पुस्तकेही संबंधित यंत्रणेची नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. त्या बिलावर आवक-जावक क्रमांकही नसल्याचे या पाहणीमध्ये स्पष्ट झाले होते. याबाबतचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यामुळे या अडीच कोटीच्या मग्रारोहयो घोटाळ्याचे खापर कोणा-कोणावर फुटते? याबबत जिल्हा प्रशासनाच्या कार्यवाहीनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सदर अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला असून, या कामाशी संबंधित असलेल्या सर्व बाबींचा अभ्यास करुनच तो सादर केला असल्याचे तहसिलदार वैशाली पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या घोटाळ्याबाबत कळंब तहसीलदारांनी ४९० पानांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. या अहवालात घोटाळ्याबाबतची सविस्तर माहिती तसेच आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे. या ४९० पानांच्या अहवालामध्ये प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचारी तसेच काही राजकीय पदाधिकाऱ्यांचीही नावे असल्याचे समजते. दरम्यान, सदर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिली.भाजपा पदाधिकाऱ्यांचाही सहभाग?४या अडीच कोटीच्या कामांची देयके मंजूर करावीत यासाठी भाजपाच्या तालुक्यातील एका पदाधिकाऱ्याने तालुका प्रशासनावर दबाव टाकल्याची चर्चा आहे. यामुळे या घोटाळ्याचे थेट राजकीय कनेक्शन उघड होत आहे. ‘त्या’ पदाधिकाऱ्यांची या सर्व प्रक्रियेत काय भूमिका होती? अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सर्व नियम डावलून पुढाऱ्याच्या सांगण्यानुसार ही बिले कशी सादर केली? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.
‘रोहयो’तील आणखी घोटाळे बाहेर येण्याची शक्यता
By admin | Updated: February 10, 2015 00:29 IST