हरी मोकाशे , लातूरउसाचे प्रमाण घटल्याने यंदा जिल्ह्यातील केवळ चार सहकारी आणि चार खाजगी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास गेल्या महिनाभरापासून सुरुवात झाली आहे़ सहकारी साखर कारखान्यांनी प्रति टनास पहिली उचल म्हणून दीड हजार रुपये जाहीर केले आहे तर खाजगी तत्वावरील एक कारखाना वगळता अन्य कारखान्यांनी अद्यापही पहिला हप्ता जाहीर केला नाही़ त्यामुळे शेतकरी धास्तावला असून ऊसाच्या पहिल्या हप्त्यावरुन राजकारण तापत आहे़जिल्ह्यात आठ सहकारी आणि चार खाजगी साखर कारखाने आहेत. यंदा ऊसाचे क्षेत्र घटल्याने मांजरा, विकास, विकास- २ आणि रेणा हे चार सहकारी साखर कारखाने सुरु आहेत़ खाजगी तत्त्वावरील अहमदपूर तालुक्यातील सिद्धी शुगर, पानगाव येथील पन्नगेश्वर, औसा तालुक्यातील श्री साईबाबा शुगर्स आणि तळेगाव (भो.) येथील जागृती शुगर्स हे साखर कारखाने सुरु आहेत़ गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने त्याचा परिणाम साखर कारखान्यांवर होत आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात ६१ हजार ४७९ हेक्टर्स उसाचे क्षेत्र होते़ त्यामुळे २९ लाख ४ हजार मेट्रिक टन उसाचे दहा कारखान्यांनी गाळप केले. परंतु, ऊसाचे क्षेत्र कमी झाले आहे़ जिल्ह्यात ४६ हजार ३९७ हेक्टर्स असे ऊसाचे क्षेत्र आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोन सहकारी साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले नाही़ गेल्या महिनाभरापासून ८ कारखान्यांचे गाळप सुरु झाले आहे़ त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा पहिल्या हप्त्याकडे लागून होत्या़ मांजरा आणि रेणा या दोन सहकारी साखर कारखान्यांनी प्रति टनास पहिली उचल म्हणून १ हजार ५०० रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले आहेत़ त्याचबरोबर जागृती शुगरनेही दीड हजार रुपयेच पहिली उचल जाहीर केली आहे़ विकास, विकास- २ या दोन्ही साखर कारखान्यांनी अद्यापही पहिली उचल जाहीर केली नाही़ तसेच सिध्दी शुगर, पन्नगेश्वर, श्री साई बाबा या तिन्ही खाजगी कारखान्यांनी अद्यापही पहिला हप्ता जाहीर केला नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ वास्तविक पहाता, मांजरा, रेणा या साखर कारखान्यांच्या कार्याचा गौरव देश पातळीवर झाला आहे़ त्यामुळे या साखर कारखान्यांकडून यंदा शेतकऱ्यांच्या मोठ्या आशा होत्या़ परंतु, पहिली उचल दीड हजार रुपये जाहीर केल्याने खाजगी कारखाने किती भाव देतील? अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे़गेल्या वर्षी मांजरा, विकास, रेणा, जागृती या कारखान्यांनी प्रति टनास पहिली उचल १८०० रुपये दिली होती तर प्रति टनास एकूण रक्कम २१५० रुपये दिली होती़ त्याचबरोबरच श्री साईबाबा कारखान्याने पहिली उचल १९०० रुपये, पन्नगेश्वरने १७०० रुपये, सिध्दी शुगरने पहिली उचल १८०० रुपये आणि एकूण भाव २०५० रुपये दिला होता़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऊसाचे क्षेत्र कमी झाले असतानाही पहिली उचल दीड हजार रुपये देण्यात येत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे़ उत्पन्न घटले़़़४दरवर्षी एकरी ३५ ते ४० टन ऊसाचे उत्पन्न होत होते़ परंतु, यंदा पाऊस नसल्याने ऊसाच्या वजनात व वाढीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे़ सध्या एकरी १८ ते २० टन असे ऊसाचे वजन होत आहे़ एकरभर उसासाठी जवळपास ३० हजार रुपये खर्च होतो़ खर्च आणि काही साखर कारखान्यांनी दिलेली उचल पाहता नगदी पीक असलेले ऊस परवडणारे नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली़४यंदा साखरेचे भाव उतरले आहेत़ त्यातच शासनाने अद्यापही कुठलेही धोरण घेतले नाही़ शासनाचे धोरण जाहीर होण्यापर्यंत शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून आम्ही प्रति टन दीड हजार रुपये पहिली उचल ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली असल्याचे मांजरा साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय देशमुख यांनी सांगितले़शेतकऱ्यांवर दुहेरी संकट़़़४एफआरपीपेक्षा कमी दर देणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकारमंत्र्यांनी दिले आहेत़ त्यानुसार प्रति टनाला पहिला हप्ता १८०० रुपये मिळणे अपेक्षित असताना कारखान्यांकडून दीड हजार रुपये दर जाहीर करण्यात येतो़ त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत़ कारण अगोदर निसर्गाने मारले आणि आता सरकार मारत आहे, अशी भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे यांनी व्यक्त केली़
उसाच्या पहिल्या हप्त्यावरून राजकारण तापले
By admin | Updated: December 5, 2014 00:52 IST