जिल्ह्यात एक हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी एक हजार ३९ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.विजयकुमार वाघ यांनी दिली. जिल्ह्यात १,८०० लस देण्याचे नियोजन होते. त्या तुलनेत ५७ टक्के कर्मचाऱ्यांनी डोस घेतला.
‘दमरे’कडे १०५ किसान रेल्वेंची मागणी
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडे १०५ किसान रेल्वेंची मागणी नोंदविण्यात आली आहे. आतापर्यंत ३३ किसान रेल्वेमधून १३ हजार ६५८ टन कांदा पाठविण्यात आला. या किसान रेल्वे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरतला आदी ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत.
शहरात किमान तापमान १२.६ अंश
औरंगाबाद : शहरात बुधवारी किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात सतत चढ-उतार होत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. अचानक थंडी वाढते आणि कमी होते, असे वातावरण राहात आहे.
आरटीओ कार्यालयात जप्त वाहनांच्या रांगा
औरंगाबाद : क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणार्या वाहनांवर आरटीओ कार्यालयातर्फे जप्तीची कारवाई करण्यात आली. अशा अवजड वाहनांच्या बुधवारी आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत लांब रांगली होती. जप्त वाहनांमुळे अधिकार्यांची वाहने उभी करण्यासाठी जागा नव्हती.